हिवरे बाजारच्या धोकादायक पाझर तलावाच्या दुरुस्तीस मान्यता !

Table of Contents

नगर : तालुक्यातील आदर्श गाव हिवरे बाजार येथील पाझर तलाव क्रमांक १ च्या धोकादायक पाझर तलावाच्या दुरुस्तीस जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नाने प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती राज्याच्या समृद्ध गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी दिली.
सन १९७२च्या दुष्काळात या तलावाचे काम झाले असून त्यानंतर ३ ते ४ वेळा वारंवार दुरुस्ती करूनही तलावाची गळती थांबत नव्हती. सदर तलावाची पाणी साठवण क्षमता ०.१३ द.ल.घ.मि होती. सन २०१९-२० च्या अतीवृष्टीत सदर पाझर पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे आणि तलावास सांडवा नसल्यामुळे तलाव फुटण्याची शक्यता निर्माण झाली होती.त्यानुसार नगर तहसीलदारांनी सदरचा पाझर तलाव फुटल्यास पुराचा धोका अहमदनगर शहरापर्यंत होईल असा अहवाल सादर करून तलाव धोकादायक असल्याचे सांगितले होते.
राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी हिवरे बाजारला भेट दिली असता पद्मश्री पोपटराव पवार यांनी संबधित तलाव दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे सांगितले.त्यानुसार मंत्री गडाख यांनी संबंधित विभागास पाझर तलाव दुरुस्तीचे अंदाजपत्रक सादर करण्यास सांगितले आणि संबंधित विभागामार्फत सर्वेक्षण करून सविस्तर अंदाजपत्रक सादर करण्यात आले.मंत्री गडाख यांच्या प्रयत्नातून सदर पाझर तलाव क्र.१ दुरुस्ती कामास प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच शासकीय निधी आणि लोकसहभाग यातून उत्कृष्ट दर्जाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
सदर पाझर तलाव दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यास हिवरे बाजार येथील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून पर्यायाने भूजल पातळी उंचावण्यास मदत होईल असेही पद्मश्री पोपटराव पवार यांनी सांगितले.

from https://ift.tt/wc0VNIt

Leave a Comment

error: Content is protected !!