
सर्व गोष्टींचे मिश्रण म्हणजे विश्व आहे. इथं कोणत्याही गोष्टींची कमी नाही. चांगलं शोधाल तर एकाहुन एक सरस आहे आणि वाईट शोधाल तर त्यातही शिरोमणी भेटतील.कारण हे मर्त्यलोकीचं विश्व आहे. त्याशिवाय ते चालुच शकत नाही.
चांगलं छान छान बोलणारा खरेच चांगला आहे का? किंवा वाईट बोलणारा खरेच वाईट आहे का?याचा बोध होणं तितकं सहज शक्य नाही.राजहंस एक असा पक्षी आहे की त्याला पाणीमिश्रीत दुध दिले तर तो त्यातील पाणी न पिता केवळ दुधच पितो.पाणी आपोआप वेगळे होते.ही रचना नैसर्गिक म्हणा,ईश्वरी म्हणा पण त्याने सत्य बदलत नाही. या विषेश गुणाने तो शुद्ध दुधच प्राशन करु शकतो.
आम्ही या संसारात रोज आहोत.आणि रोज फसत आहोत.माणसं माणसांना रोज फसवतात.आम्हाला खरा खोटा माणुस ओळखता येत नाही,तिथं आम्ही हरीला काय ओळखणार? हे मान्यच करावं लागेल.
नाथबाबा म्हणतात, हरी ओळखता आरा तर दैन्य संपते आणि सुखाची प्राप्ती होते.
ओळखिला हरी धन्य तो संसारी । मोक्ष त्याचे घरीं सिद्धीसहित ॥ १ ॥सिद्धी लावी पिसें कोण तया पुसे । नेलें राजहंसें पाणी काय ॥ २ ॥काय तें करावें संदेहीं निर्गुण । ज्ञानानें सगुण ओस केलें ॥ ३ ॥केलें कर्म झालें तेंचि भोगा आलें । उपजले मेले ऐसे किती ॥ ४ ॥एका जनार्दनीं नाहीं यातायाती । सुखाची विश्रांती हरीसंगें ॥ ५
नाथ महाराज म्हणतात,ज्याने संसारात राहून सुद्धा आपल्या आत्मस्वरूपाला म्हणजे हरीला ओळखले, तो खरा धन्य आहे. त्याचे घरी मोक्ष सर्व रिद्धी सिद्धीहीत पाईक होतो.पण ज्याने भगवंताला ओळखले, असा भक्त रिद्धी सिद्धीच्या नादाला लागत नाही. कारण त्यामुळे जन्ममृत्यू टळत नाही.म्हणून शहाणा मनुष्य त्या भानगडीत पडत नाही.जसा राजहंस दुधातील पाणी वेगळं करून फक्त दूध घेतो. त्याप्रमाणे शहाणा मनुष्य फक्त हरीलाच घेतो. हरीजवळ असणाऱ्या रिद्धी सिद्धीचा स्वीकार करीत नाही.ज्या रुपामध्ये संशय आहे. असे भगवंताचे निर्गुण स्वरूप घेऊन काय करायचे?त्यापेक्षा भगवंताच्या खऱ्या स्वरूपाचे यथार्थ ज्ञान झाले असता त्याच ज्ञानाने सगुणाचा शेवट होतो.मनुष्य जे कर्म करतो त्या कर्माचे फळ तो भोगत असतो.आत्तापर्यंत अशा कर्मामुळेच किती जण जन्मले आणि मेले याची गणती नाही.
नाथ महाराज म्हणतात, हरीच्या संगतीत राहिल्यानंतर जन्म आणि मृत्युचे दुःख नाहीसे होते.अंतः हरीच्या प्राप्तीनेच सुखाची विश्रांती अनुभवता येते.आम्हाला भक्ती केल्याने काही चमत्कार घडावा,संकटं आपोआप नाहिसी व्हावीत म्हणजे रिद्धी सिद्दी मार्गाने आम्हाला देव हवा आहे.त्याने देव दुर जात आहे.सत आचरण,सत्कर्मातुनच त्याची प्राप्ती होते.सज्जनहो अशा हरीला आम्ही शोधत नाही. त्यामुळे दुःख आमची पाठ सोडत नाही. संतसहवासाने प्रपंच करुन हरी ओळखता येतो.पण ती इच्छा मनोमन निर्माण व्हायला हवी.
रामकृष्णहरी
from https://ift.tt/3dweNyu