वैराग्य निर्माण होणं म्हणजे समस्त षडरिपुंवर विजय मिळवणे आहे. प्रपंच न करता वैराग्य येणं ही सध्याच्या काळातली अशक्य गोष्ट आहे.प्रपंचात सुख नाही हे वारंवार ऐकून तो करण्या आधीच वैराग्य निर्माण झाले तर ते काही फार काळ तग धरणार नाही. 
माऊली म्हणतात, गृहदग्ध न होता शिंपी जे उदक।शेखी तो निष्टंक काय जाणे।।
लहान बाळाला अग्नीचे आकर्षक वाटते.अग्नीजवळ त्याला घेऊन बसले की ते सारखे अग्नीज्वाळा धरु पहाते.आपण कितीही हात पकडून ठेवला तरी ते ऐकत नाही पण एकदा का चटका बसला की क्षणात अग्नी काय करतो,याचे त्या बाल मनालाही अकलन होते.आकर्षणाची जागा वैराग्य घेते.तसं प्रपंच न करता तो कठीण आहे म्हणणं अल्पमती मनुष्याचे कामच नाही.माऊली म्हणतात,या देहरुपी घरावर तुळशीपत्र ठेवण्याची इच्छा आपोआप होतच नाही. तो प्रपंचजर्जर झाल्याशिवाय ते घडत नाही.
माणसं वरपांगी सतत दाखवत असतात की खुष आहे,समाधानी आहे, आनंदी आहे.पण हे पुर्णः खरं नाही.आत्मज्ञानी मनुष्यच प्रपंचात राहुनही वैराग्य धारण करू शकतो.
वैराग्याचं ढोंग करणं फार सोपं आहे.तुकोबाराय म्हणतात,
भोरप्यानें सोंग पालटिलें वरी । ध्यान धरी मत्स्या जैसें ॥१॥
टिळे माळा मैंद मुद्रा लावी अंगीं । देखों नेदि जगीं फांसे जैसे ॥ध्रु.॥
अर्थः बहुरूपी विविध सोंगं घेतो,किंवा बगळा मासा पकडण्यासाठी एक पाय वर धरुन ध्यानस्थ बसल्याचं सोंग करतो. तसं गंध,टिळा,माळा घालून वैराग्यमुर्ती होऊन भक्तीमार्गात फसवणारे खूप आहेत.
वास्तविक भक्तीमार्ग हा मनुष्याला वैचारिक बैठक देणारा एक सुंदर मार्ग आहे. तो आत्मकल्याण करणारा तर आहेच पण भोवतालचं जग पवित्र करण्याची क्षमता प्रदान करणारा राजमार्गही आहे.हे वैराग्य प्रपंचात राहुन धारण करणं अधिक सोपं आहे. प्रपंच करणारा गृहदग्ध होतोच.पण तो त्याला समजु शकत नसल्याने,आलेला भोग भोगावाच लागतो या नाविलाजीक विधानाने बैलानं जसा गाडा ओढत रहावं तसं हे चालु आहे.मात्र जगावं कसं?याचं तंत्र सापडलं की गुंतणं थांबत.अध्यात्मात ती जादु आहे. पण त्यालाचं सोंग केलं तर मग वाचवणारा कुणीच नसेल.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/3d6nn75

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *