मुंबई: अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील कोरोना अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत ११ रुग्णांचा भाजून मृत्यू झालेल्या प्रकरणी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलत कारवाई केली आहे. या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यासह इतर दोन वैद्यकीय अधिकारी आणि एका स्टाफ नर्सला निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, या प्रकरणी दोन स्टाफ नर्सना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
अहमदनगर जिल्हा रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात येत असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरवरून घोषित केले आहे.
निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढाकणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा शिंदे आणि स्टाफ नर्स सपना पठारे यांचा समावेश आहे. तर स्टाफ नर्स आस्मा शेख आणि स्टाफ नर्स चन्ना आनंत यांची सेवा समाप्त करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
ऐन सणासुदीच्या काळात अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत ११ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेने संपूर्ण देशभर हळहळ व्यक्त करण्यात आली. या दुर्घटनेवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवत ताशेर ओढले होते. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचा अहवाल आठ दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले होते.

from Parner Darshan https://ift.tt/3CYWRb7

By News

Leave a Reply

Your email address will not be published.