शरीर कुठपर्यंत आहे?असा प्रश्न पडत नाही तोवर आपण पराधीन असल्याचा बोध होत नाही. एक मर्यादा अशी आहे की त्याला वयाचं बंधन नाही.ती आयुष्यमर्यादा आहे.मर्यादित असणं म्हणजेच पराधीनत्व आहे.
नोकरी करताना वेगवेगळ्या पोस्टवर काम करणाऱ्या प्रत्येकाला वेगवेगळे अधिकार असतात.जसं पद तसा अधिकार.पण तो नोकरी काळातच असतो शिवाय तिथल्या व्यवस्थेसाठीच तो असतो.इतर ठिकाणी तो चालत नाही. अगदी एखादा उच्च पदस्थ अधिकारी एखाद्या गर्दीच्या ठिकाणी लोकांमध्ये जाऊन बसला तर त्याला सर्व सामान्य व्यक्ती म्हणुनच जगावे लागते.तद्वत आमचं पृथ्वीवर रहाणं आहे. जन्माला येणं सर्वांचं समान आहे तसं जाणं सुद्धा समानच आहे.
कर्तव्याने कोण किती मोठा झाला,कोण किती लहान राहिला हे प्रापंचिक विचारातच ग्राह्य आहे. आपण समाजाच्या किती कामी आलो हा खरा जगण्यातला विचार आहे. अडावर स्रिया पाणी भरायला जातात.आडाची किंमत नसतेच त्यावेळी.तिथं किंमत असते पाणी शेंदण्याच्या रहाटाला.तो रहाट पाणी भरण्यासाठी सहाय्यक आहे. त्याने हातावर पाणी शेंदावं लागत नाही. म्हणून त्याचं महत्त्व आडापेक्षा मोठं असतं.तसं विश्वाचा नियंता सर्वाहुन श्रेष्ठ आहे. तरीही माणसं अनमोल होतात.अगदी देवाइतकी प्रिय होतात.कशामुळे?त्यांनी माणसांच्या वेदनेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला म्हणून.
आपण आपला प्रपंच सजवलाच पाहिजे पण हे सगळं करीत असताना एखाद्याच्या फाटलेल्या प्रपंचाला थिगळं लावण्याचा प्रयत्न म्हणजे देवपूजा आहे. त्यानेच आम्ही पराधीन तत्वावर विजय मिळवु शकतो.मृत्यूनंतरही शेकडो वर्षे नाव निघत रहावं हा पराधीन तत्वावर मिळवलेला विजय आहे.
पण असं जगणं सामान्य नाही.कोणत्याही गोष्टींची लाज न बाळगता सत्कर्म करत रहावे लागतील.त्यात दोष निर्माण होऊ नयेत म्हणून देवालाच मध्यस्थ करावा लागेल.तिथं माणूस मध्यस्थ चालत नाही.
नाथबाबा म्हणतात, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा।पती तो लक्ष्मीचा जाणतसे।।
सकल जीवांचा करीतो सांभाळ।तुज मोकलिल ऐसे नाही।।
सर्वांना सांभाळणारा विश्वनियंता आहेच.आपण आपला वाटा उचलुन कार्यरत राहिले पाहिजे. म्हणजे परस्वाधीन होण्याच्या आत सुंदर जगण्याचा आनंद घेता येईल.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/3oT7A1Y

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *