
नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देश आणि देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकारने मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. आपण वैज्ञानिकांच्या सल्ल्यानुसारच कोरोना विरोधातील लढाई लढत आहोत. आपले वैज्ञानिक कोरोनावर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. सध्या देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. यामुळे सावध राहण्याची आवश्यकता आहे. असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. या वेळी त्यांनी, आता आपण 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी 3 जानेवारी 2022 पासून लसीकरणाला सुरुवात करत आहोत, अशी घोषणाही त्यांनी केली. ते कोरोना पार्श्वभूमीवर देशाला संबोधित करत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, अद्याप कोरोना संपलेला नाही, त्यामुळे सतर्क राहणे आवश्यक आहे. 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना कोरोना लस मिळाल्याने कोरोनाविरोधातील लढाई आणखी मजबुत होईल. यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांच्या पालकांची चिंताही दूर होईल. या शिवाय कोरोना वॉरियर्सनाही लसीचा बुस्टर डोस दिला जाणार आहे.
15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांबरोबरच कोरोना विरोधातील लढाईत महत्वाचे योगदान देणाऱ्या हेल्थ केअर आणि फ्रंटलाईन वर्कर्सनाही कोरोना लसीचा बुस्टर डोस देण्यात येणार आहे. हेल्थ केअर आणि फ्रंटलाईन वर्कर्सना प्रिकॉशन म्हणून 10 जानेवारीपासून बुस्टर डोस देण्यास सुरुवात होईल, याच बरोबर 60 वर्षांवरील सहव्याधीग्रस्त नागरिकांनाही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 10 जानेवारीपासून बुस्टर डोस देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे, अशी घोषणाही यावेळी पंतप्रधान मोदींनी केली.
अफवा आणि भीती निर्माण करण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत, त्यांवर विश्वास ठेऊ नका त्यांपासून दूर राहा. आपण सर्वांनी जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम राबविली आहे. आपल्या सर्वांचे प्रयत्नच देश कोरोनाविरोधात मजबूत करतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
from https://ift.tt/3mA6A1f