
राळेगणसिद्धी : येथे पार पडलेल्या नेत्र तपासणी शिबिरातील ८५ रुग्णांवर प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. तात्याराव लहाणे व डॉ. रागिणी पारेख यांच्या मार्गदर्शनाखी मोतीबिंदू शस्रक्रिया मुंबई येथील जे. जे. हॉस्पिटलमध्ये करण्यात आल्या.
अण्णा हजारे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई हजारे यांच्या पुण्यस्मरणदिनानिमित्त राळेगणसिद्धी येथे १९ नोव्हेंबर रोजी नेत्र तपासणी शिबीर पार पडले होते. या शिबीरात पारनेर, श्रीगोंदा, राहुरी, शिरूर व नगर तालुक्यातील रूग्णांची तपासणी करण्यात आली होती. बुधवार (दि. १५) व गुरुवार (दि.१६) डिसेंबर रोजी मोतीबिंदू झालेल्या ८५ रूग्णांवर शस्रक्रिया पार पडल्याची माहिती सरपंच लाभेष औटी यांनी दिली.
या शिबिरात सहभागी झालेल्या रूग्णांच्या डोळ्यातील मोतीबिंदूवर कृत्रिम भिंगारोपणासह बिनटाक्याच्या शस्रक्रिया करण्यात आल्या असून रूग्ण व नातेवाईकांना पुढील ४० दिवसांत कशी काळजी घ्यावयाची याचे मार्गदर्शन नेत्रतज्ञ डॉ. तात्याराव लहाणे यांनी यावेळी रुग्णांना केले.
डॉ. लहाणे यांच्या रूपाने दृष्टी देणारा देव माणूस भेटल्याची प्रतिक्रिया वृद्ध नेत्ररूग्णांनी व्यक्त केल्या. आजपर्यंत राळेगणसिद्धीसह परिसरातील जवळपास १५०० पेक्षाही अधिक रुग्णांवर सरपंच लाभेष औटी यांच्या माध्यमातून यशस्वी शस्रक्रिया पार पडल्या आहेत त्यामुळे परिसरात त्यांची ‘दृष्टीदाता’ म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
सरपंच लाभेष औटी, उद्योजक सुरेश पठारे, सुनिल जाधव, रुपेश फटांगडे, शाम पठाडे, संदिप पठारे, गणेश हजारे, विश्वास पांडूळे तसेच जे. जे. हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्स आदींच्या सहकाऱ्याने शिबीर यशस्वीपणे पार पडले.
from https://ift.tt/3e3k15q