नवी दिल्ली : विखे-पवार घराण्याचा महाराष्ट्रातील राजकिय संघर्ष सर्वश्रुत आहे. पण या संघर्षाची झलक संसदेतही पाहायला मिळाली. संसदेत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपाचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली. यूपीए सरकारच्या कारभारावर खा. सुजय विखे यांनी ताशेरे ओढल्यानंतर त्यावर खा. सुप्रिया सुळे यांनीही प्रत्युत्तर दिले.
त्याचे झाले असे की, सहकाराबद्दल बोलताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी यूपीए सरकारच्या कामावर टीका केली. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, यूपीए सरकारच्या काळात हे स्वतः काँग्रेसमध्ये होते. हे स्वतः यूपीए सरकारच्या योजनांची लाभार्थी होते. खाल्ल्या मिठाला जागावं.. माझ्या आईने मला दिलेली शिकवण आहे, असेही खा.सुळे म्हणाल्या. यूपीए सरकारमध्ये असताना डॉ.सुजय विखे यांचे वडील मंत्री होते. त्यावेळी गांधी परिवाराशी ते भेटायचे. त्यावेळी जी धोरणं तयार केली गेली त्यात ते होते, त्यामुळे खाल्ल्या मिठाला जागलं पाहिजे असे मला माझी संस्कृती सांगते, असेही खा.सुळे म्हणाल्या.
यावेळी वयोश्री योजने बद्दल बोलताना अभिमानानेखा. सुजय विखे सांगत होते.अहमदनगरमध्ये मोदींच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम करणार आहे. बाकीच्या खासदारांना योजनांची माहिती नसते असे डॉ. विखे म्हणाले. त्यावर खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या त्या योजनेत देशातला कुठला जिल्हा अग्रेसर आहे याची आधी जरा माहिती घ्या.

एका मराठी प्रसारवाहिनीशी संवाद साधताना खासदार डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले की, पंतप्रधान मोदींमुळेच साखर कारखाने टिकले. पेट्रोल वरचा कर अनेक राज्यांनी कमी केला परंतू महाराष्ट्राने कमी केला नाही. आर्थिक स्थितीमुळे महाराष्ट्राने घेतला नसेल मी समजू शकतो, पण वाईनसाठी एवढी लगबग का? वाईनमध्ये अल्कोहोल नाही असे म्हणणाऱ्या महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी ती पिऊन एकदा सरळ चालून दाखवावे, असे खा. विखे म्हणाले.
पुढे बोलताना डॉ.विखे म्हणाले की, सुप्रिया सुळे जेव्हा बोलत होत्या तेव्हा दुर्दैवाने मी लोकसभेत नव्हतो. वेळ येईल तेव्हा मी संसदेत उत्तर देईन. मी जे चार मुद्दे मांडले तुम्ही त्याला खोडून काढा. महाविकास आघाडी सरकारचे खासदार केंद्राच्या योजनांचे कार्यक्रम घेतात तेव्हा मोदींचे फोटो का नाही लावत. ज्या केंद्राच्या योजनांचा फायदा घेता किमान त्याचा उल्लेख करा. पस्तीस वर्षांचा निर्णय पस्तीस मिनीटात झाला याचा साक्षीदार मी आहे. साखर उद्योगाबाबत युपीए आणि मोदी सरकारच्या निर्णयांची समोरासमोर बसून चर्चा करा साखर उद्योगाला आलेलं स्थैर्य केवळ मोदी सरकारच्या निर्णयामुळे आले आहे. मोदींमुळेच साखर कारखाने टिकले. महाविकास आघाडीच्या अनेक खासदारांचे सहकारी कारखाने आहेत. किमान माणुसकीच्या नात्याने केंद्राने दिलेल्या लाभांचा उल्लेख करा, असे खासदार विखे म्हणाले.

from https://ift.tt/FkqJRbg

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *