सावलीतुन उन्हात जाण्याचं धारिष्ट्य दाखवा !

Table of Contents

मोठ्या झाडाखाली कोणतही पिक परिपूर्ण येत नाही हे आपण जाणताच.मनुष्य जीवनाचही असच आहे.स्वतःला सिद्ध करताना आधार हा घ्यावाच लागतो.कुणाचा तरी आदर्श डोळ्यासमोर असल्याशिवाय जगण्याची दिशा ठरवता येत नाही.एकदा ते पक्क झालं की मग खरं जगणं सुरू होतं.
आपण ज्यांचा आधार शोधला आहे. त्यांचं तंत्र तर आपण हाशिल करणारच आहोत पण त्यातही आपलं स्वतःचं तंत्र विकसित करता येणं म्हणजे परिपुर्णता आहे. असं तंत्र कोणत्याही कामात जीव ओतल्याशिवाय मिळत नाही. त्यासाठी सात्विकता अत्यंत महत्वाची आहे. कारण गुरुची विद्या गुरुलाच शिकवण्याच्या परंपरेचे पाईक आपण होणार नाही याची दक्षता घेऊन प्रगती करायची आहे. त्यासाठी कोणत्याही क्षेत्रात तसा गुरु मिळणं हे भाग्याचं असतं.ते सात्विक मिळाले तर ते कोणतही तंत्र तुमच्यापासून लपवून ठेवणार नाहीत.
तुम्ही मोठे झाल्याचा अभिमान त्यांना वाटेल असं गुरुत्व मिळणं म्हणजे मी याला पुर्वपुण्याई कामाला आली असं म्हणतो.माझे गुरुदेव मला म्हणतात,तु माझ्यापेक्षा मोठा झाला पाहिजे.मला जे प्राप्त झालं आहे त्यापुढचं तुला प्राप्त झाले पाहिजे.
क्षेत्र कोणतही असो तिथं समर्थ गुरु प्राप्त करण्याची इच्छा मनात असली पाहिजे. अन्यथा खुरट्या झाडासारखी गत होईल.पण त्यासाठी सावलीतुन बाहेर पडण्याचं धारिष्ट्य पाहिजे. उन्हाचे चटके खाण्याची तयारी पाहिजे. त्याशिवाय जगण्यात थ्रिल निर्माण होत नाही.
रटाळ जीवन जगणं म्हणजे तो जीवंतपणीचा मृत्यू आहे. आकाशात तारे अगणित आहेत. पण ध्रुवाचं स्थान विशेष आहे.आमची गणती अगणितात होऊ नये असं वाटत असेल तर प्रपंचाबाहेर डोकावता आलं पाहिजे. समाज हिच सेवेची संधी आहे. संधी शोधता आली पाहिजे. ज्यांनी ज्यांनी समाजजीवन सुसह्य,सुकर करण्याचा प्रयत्न केला ते अजरामर झाले हा इतिहास आहे.अशा अनेक संधी आमची वाट पहात आहेत, गरज आहे ती फक्त सावलीतुन बाहेर येण्याची.
ए.सी.ची हवा खाण्यात धन्यता वाटत असेल आणि डोक्यात काही सुकर्म नसेल तर ते जीवनही मृतवतच आहे. इतिहासानं नोंद घ्यावी असं काही करण्यासाठी,शारीरिक, मानसिक कष्ट करण्याची तयारी तरुणांनी ठेवली तर सामाजिक स्थिती आपोआप बदलेल.आपण ज्या झाडाखाली उभे रहाणार आहात त्या झाडाकडे तुम्हाला उन्हात नेण्याची क्षमताही असली तर तुमची आत्मोन्नती आणि भौतिक विकास झालाच म्हणून समजा.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/RDlBXSG

Leave a Comment

error: Content is protected !!