
पारनेर : शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षांनी एकत्र येत राज्यात सरकार स्थापन केले. २८ नोव्हेंबर २०१९ मध्ये राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारलाआता दोन वर्षे पूर्ण होत आहेत. याकाळात अनेकवेळा महाविकास आघाडीचे सरकार पडणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र महाविकास आघाडीचे सरकार पडले नाही. आज निवडणुका झाल्यास राज्यातील जनतेचा कौल कुणाला मिळेल याचा अंदाज घेणारा सर्व्हे समोर आला आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून अनेक नेत्यांच्या चौकशी सुरू आहेत. राष्ट्रवादीचे नेते, शिवसेना नेते यांच्या ईडी मार्फत चौकशी सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यांनी राज्याचा पदभार घेतल्यानंतर कोरोनाने थैमान घातले होते. अशा कठीण परिस्थितीत उद्धव ठाकरेंनी कारभार केला आहे. याच काळात पुरामुळे अनेकांचे अतोनात नुकसान झाले होते.
साम टीव्हीने केलेल्या या सर्वेनुसार राज्यात आज निवडणूक झाल्यास राज्यात महाविकास आघाडीचे सरकार राज्यातील सत्तेत कायम राहणार आहे. तर भाजपाला पुन्हा एकदा विरोधी पक्षात बसावे लागण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढल्यास या तिन्ही पक्षांना मिळून १७८ जागा मिळतील. तर भाजपालाही मतदारांचा चांगला पाठिंबा मिळण्याची शक्यता असून, भाजपाला १०१ एवढ्या जागा मिळतील. तर इतरांच्या खात्यात ९ जागा जातील.
दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढल्यास शिवसेनेला ७७, राष्ट्रवादी काँग्रेसला ५९ आणि काँग्रेसला ४० जागा मिळतील. तर सर्व पक्षांची स्वतंत्र निवडणूक लढवल्यानंतरही भाजपाच्या जागा १०४ च्या आसपास राहण्याची शक्यता या सर्वेमधून व्यक्त करण्यात आली आहे. तर इतरांच्या खात्यामध्ये ७ जागा जातील. तसेच सर्व पक्ष स्वतंत्र लढल्यास भाजपाला २७.९ टक्के मते मिळतील. शिवसेनेला २४ टक्के आणि राष्ट्रवादी काँग्रेसला २१.४ टक्के मिळतील. तसेच काँग्रेसला १४.२ टक्के मते मिळतील. तर मनसेला २.९ आणि वंचितला २.५ टक्के मते मिळतील.
तसेच महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्ष एकत्र लढल्यास महाविकास आघाडीला ३९.८ टक्के मते मिळतील. मात्र काँग्रेसविना महाविकास आघाडी झाल्यास त्यांना १९.८ मते मिळतील. तर भाजपा २७.५ टक्के मते मिळतील.
from https://ift.tt/3FPHcfc