
सतीश डोंगरे
शिरूर : शिरूर तालुक्यातील बाभुळसर खुर्द येथील शेतकरी कुटुंबातील सुजाता डाळिंबकर हिने भोपाळ मध्ये झालेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत घवघवीत यश मिळवले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तिने हे यश मिळविले त्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये तिच्यासोबत तेजस्विनी सावंत यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंचा देखील समावेश होता.
जानेवारीमध्ये केरळ मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. मात्र आर्थिक अडचणीतून मार्ग काढत असताना या स्पर्धेपर्यंत पोहचू शकेल की नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे त्यासाठी तिने स्वतः आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.
याबाबत बोलताना सुजाता हिने सांगितले की, “टोकिओ ओलंपिक 2020 स्पर्धेच्या निवड चाचणी साठी खेळल्या गेलेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत मध्यप्रदेश मधील भोपाळ येथे माझी निवड झाली आहे त्यानंतर केरळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ट्रायल 1 आणि 2 मध्ये ही माझी निवड झाली. मात्र केवळ आर्थिक कारणांमुळे मला पुढील स्पर्धा खेळता आलेली नाही. मी शेतकरी कुटुंबातील असल्याने सर्व आर्थिक खर्च पूर्ण करणे शक्य होत नाही. तरी मला या खेळासाठी लागणारी रायफल घेण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. या रायफल ची अंदाजे किंमत 3 लाख रुपये इतकी आहे. तरी मला अर्थिक मदत करावी,” असे आवाहनही तिने केले आहे.
दरम्यान, सुजाता हिने मिळविलेल्या यशाबद्दल बाभुळसर खुर्द गावातील ग्रामस्थांना तिचा सार्थ अभिमान आहे. आम्ही सर्वजण तिला मदत करीत आहोतच परंतू आपणही सर्वांनी खारीचा वाटा उचलावा व देशासाठी गौरवास्पद अशा जागतिक पातळीवरील कामगिरीचे साक्षीदार व्हावे, असे बाभुळसर खुर्द ग्रामस्थांनी म्हटले आहे.
from https://ift.tt/3smdJ91