शिरूर : पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी गावच्या 23 वर्षीय तरुण शेतकऱ्याने शासनाच्या धोरणाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केली. अशा आत्महत्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना करणे भाग पडू नये यासाठी सरकारने धोरण बदलावे, अशी मागणी शिरूर तालुका शेतकरी संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन नुकतेच शिरूरच्या तहसीलदारांना देण्यात आले.
शेतकरी संघटनेने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ‘भारत हा कृषीप्रधान देश आहे. महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या 19 मार्च 1986 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण गावच्या साहेबराव कर्पे पाटील यांनी कुटुंबासह केली होती आणि या आत्महत्येची एक चिठ्ठी लिहून ठेवली होती त्यावेळी या चिठ्ठीमध्ये सरकारच्या धोरणामुळे ही आत्महत्या होत आहे असे लिहिण्यात आली होते. त्यावेळी शेतकरी संघटनेचे नेते स्व. शरद जोशी यांनी श्रद्धांजली सभेत सांगितले होते की, सरकारने शेतीमालावरील निर्यात बंदी उठवली नाही किंवा उत्पादन खर्चावर आधारित भाव दिला नाही तर असे प्रसंग गावोगाव पाहायला मिळतील पण सन 1986 पासून आजपर्यंत महाराष्ट्रात 80 हजार आत्महत्या झाल्या तसेच देशभरात 3 लाख शेतकऱ्यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आत्महत्या केल्या. पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी या गावच्या सूरज जाधव नावाच्या शेतकऱ्याने व्हिडीओ करत विषाची बाटली पिऊन सरकारच्या धोरणाविरुद्ध आत्महत्या केली. अशा आत्महत्या होत राहिल्या तर महाराष्ट्राला व देशाला लागलेला आत्महत्येचा कलंक कधीच पुसणार नाही. महाराष्ट्रातील व देशातील सरकारे बदलली पण धोरणात काही बदल झाला नाही. आता तरी या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने धोरणात बदल करून आत्महत्या थांबवाव्यात, असे या निवेदनात म्हटले आहे.
जर शासनाने याचा गांभीर्याने विचार केला नाही तर शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यभर शासनाचे विरुद्ध निदर्शने, आंदोलने, मोर्चे काढले जातील. त्यामुळे समाजात अशांतता कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला तर त्याची जबाबदारी शासन प्रशासनाची असेल. असेही शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी शेतकरी संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब घाडगे, शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुहास काटे, शिरूर तालुका अध्यक्ष बापूसाहेब शिवले, उपाध्यक्ष दत्तात्रय भुजबळ, बाबासाहेब थिटे, भागिनाथ फंड, बापूसाहेब कामठे, युवा आघाडीचे तुषार भगत, अंकुश जाधव, राजेंद्र ढमढेरे, दिलीप बेंद्रे, बाळासाहेब तोडकर, सुनील ढमढेरे आदी उपस्थित होते.

from https://ift.tt/2oyV5us

By News

Leave a Reply

Your email address will not be published.