पारनेर : ऐंशी टक्के समाजकारण आणि केवळ वीस टक्के राजकारण या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत चौदा वर्षांपूर्वी आपण मनसेच्या माध्यमातून राजकारणात आणि समाजकारणात प्रवेश केला.
तेंव्हापासून समाजकारणाच्या माध्यमातून आपण पारनेर तालुक्यात आणि पारनेर शहरात पक्ष बांधणीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत.या प्रयत्नांना चांगले यश मिळत असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहराध्यक्ष वसीम राजे यांनी सांगितले.
राजे यांचा ९ मार्च,बुधवारी वाढदिवस आहे.वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्यांनी पारनेर अपडेट, पारनेर दर्शनाला विशेष मुलाखत दिली.मुलाखतीत त्यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कामांचा विस्तृत आढावा घेतला.
राजे म्हणाले की,राज ठाकरे यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी सामाजिक कामांचा मोठा उपयोग होतो हा आपला अनुभव आहे.सर्वसामान्यांच्या वयक्तिक अडचणी सोडवण्याबरोबरच सातत्याने सार्वजनिक विषय हाताळल्याने मनसेचे काम,राज ठाकरे यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचवणे सोपे झाले.परिणामी तालुक्यातील अनेक गावांमध्ये मनसेच्या शाखा स्थापन करण्यात यश आले.यासाठी तालुक्यातील जुन्या जाणत्या मनसे सैनिकांबरोबरच तरूण कार्यकर्त्यांची साथ लाभली असल्याचे वसीम राजे यांनी सांगितले.
दोन वर्षांपूर्वी करोना महामारीच्या संकटामुळे संपूर्ण जग हादरले.गोरगरीब जनतेबरोबरच उच्च वर्गीय श्रीमंत वर्गही करोना संसर्गाच्या गडद सावटाखाली हवालदिल झाल्याचे, भांबावून गेल्याचे चित्र होते.या जागतिक महामारीत सर्वसामान्यांना आधार, धीर देण्याचे काम करता आले याचे समाधान वाटते.
करोना संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर टाळेबंदी लागू करण्यात आली.अनेकांचे रोजगार गेले.हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांच्या चुली पेटणे दुरापास्त झाले.या कुटुंबांच्या चुली पेटवण्यासाठी शक्य झाले तेवढ्या कुटुंबांना किराणा वाटप करण्यात आले.गरजेनुसार इतर मदत करण्यात आली असल्याचे राजे म्हणाले.
टाळेबंदीच्या काळात परजिल्ह्यातील, परराज्यातील मजूरांचे मोठे हाल झाले.रोजगार नसल्याने व आपल्या गावाकडे परतण्यासाठी कोणतेही साधन नसलेल्या मजूरांनी पारनेरच्या बसस्थानकावर,बाजार तळावर गर्दी केली होती.या मजुरांपुढे असलेल्या अडचणींचा डोंगर कमी करण्यासाठी काम करता आले.हाताला काम नसलेल्या, दोन वेळच्या जेवणासाठी मोताद झालेल्या मजुरांची जेवणाची सोय करण्यात आली.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, मनसेचे नेते,माजी गृहमंत्री बाळा नांदगावकर यांच्या प्रेरणेमुळे करोना संसर्ग काळात काम करणे शक्य झाल्याचे वसीम राजे म्हणाले.
करोना प्रतिबंधक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करणे हाच करोना संसर्ग टाळण्याचा एकमेव उपाय आहे.ही बाब जनतेच्या मनात रूजवण्यासाठी पारनेर शहर मनसेच्या वतीने मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली.मास्क,सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.संसर्गाच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी, आधार देण्यासाठी मनसे सैनिकांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणावर काम करता आले याचे मनस्वी समाधान असल्याचे राजे यांनी सांगितले.
मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना आपल्या सामाजिक कामाबद्दल समजल्यावर त्यांच्याकडून होणाऱ्या कौतुकामुळे समाजासाठी काम करण्यासाठी नवी उर्जा मिळते.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनुसार व मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात पारनेर तालुक्यात पक्ष वाढीसाठी आणखी जोमाने काम करण्याचा संकल्प आपण वाढदिवसाच्या निमित्ताने केला असल्याचे वसीम राजे यांनी सांगितले.

from https://ift.tt/BHWSP9a

By News

Leave a Reply

Your email address will not be published.