माऊली म्हणतात,
जरी ह्रदयी विषय स्मरती।
तरी निसंगाही आपजे संगती।
संगी प्रगटे मुर्ती।
अभिलाषाची।।
जेथ कामु उपजला।
तेथ क्रोधु आधींचि आला।
क्रोधी असे ठेविला।
संमोह जाणे।।२/३२२ज्ञा.
अर्थःअंतकरणात विषयांची नुसती आठवण असेल,तर वाईट संग टाकलेल्यांनाही पुन्हा विषय चिकटतो.व त्या विषयासक्तीमुळे विषयप्राप्तीची इच्छा प्रगट होते.
जेथे काम उत्पन्न होतो येथे क्रोधाने आपले बिऱ्हाड अगोदरच ठेवलेले असते.आणि जेथे क्रोध आला तेथे कार्यकारणाविषयी अविचार ठेवलेला आहेच,असे समजा.
माझा एक मित्र मला म्हणाला महाराज मी आता मद्यसेवन पुर्ण बंद केले आहे. पण मित्र सोडले नाहीत. मी त्यांच्यासोबत गुत्यावर जातो पण मद्याला हात लावत नाही चकना खातो फक्त.
मी म्हणालो त्या मित्रांची संगतसुध्दा सोडायला हवी.पण त्याने ते काही ऐकले नाही.
मुळात जी गोष्ट अयोग्य आहे हे कळाल्यावर त्याचा संग सोडणे हितकारक असते.अन्यथा पुन्हा निसंगाही आपजे संगती हे अगदी खरे आहे. पुढे तो मित्र चारसहा महिन्याने मद्यपी झालेला दिसला.असो हे उदाहरण मी वास्तवनिष्ठ आणि स्वतः अनुभवल्याने सांगितले. पण याहुनही अविचारांची नशा असलेली संगत भयंकर आहे.
आपण ज्यांच्या सोबत रहातो त्यांचे चरित्र कसे आहे याचा शोध न घेण्याचा अविवेक अगदी सुज्ञ व्यक्तीकडून सुद्धा घडु शकतो.आणि नकळत त्याचं अनुकरण होतं.शिवाय एकदा का याची गोडी लागली की मग लोकलज्जा नाहीशी होती.
कारण जेथे कामु उपजला।तेथे क्रोधु आधिची आला।
हे सत्य आहे.विषयासक्तीमुळे त्याला विरोध करणारांचा अवमान करणे फार कठीण रहात नाही.शिवाय आपण करत असलेल्या आचरणाविषयी विचार करण्याऐवजी अविचाराने वागण्याची बुद्धी आपोआप होते.म्हणून मन अभिलाषेची शिकार होण्यापूर्वी मनाला वारंवार समजावे लागणार आहे.
जगातील विषय आम्हाला आकृष्ट न करतील तरच नवल!पण ते वेळीच झटकता येणे शक्य आहे. त्यासाठी जसं आहे तसं जगण्याची मजा घेता आली पाहिजे. मागच्या भागात आपण बुद्धी या विषयावर चिंतन केले आहे. या ठिकाणी माऊलींनी जरी ह्रदयी विषय स्मरती।असा उल्लेख केला आहे.हे मनालाच उद्देशून आहे. आपण सहज म्हणतो,तुमच्या मनात काहीतरी भलतेच विचार चालू आहेत.आज तुमचं चित्त काही थाऱ्यावर दिसत नाही. मन,बुद्धी, चित्त आणि अहंकार हे एकमेकांचे पक्के सोबती आहेत.संगी प्रगटे मुर्ती अभिलाषेची हे सांगण्यामागचा अर्थ हाच आहे. मनात विषयाने जोर पकडला की मग एक त्या विषयाचं चित्तामधे चित्र तयार होतं.घर बांधायचं ठरलं की मग खड्डे खांदण्यापासुन मनात बौद्धिक विचाराने चित्तात घराचं चित्र तयार झालेलं असतं.
सज्जनहो सगळं सुंदर अलबेल जीवन जगणं प्रत्येकाला शक्य होईलच असं नाही. परिस्थितीनुरुप जीवन जगणे भाग पडते.पण मन पवित्र ठेवण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न तुम्हाला सुंदर जीवनाकडे घेऊन जाईल.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/3EwEWcn

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *