
मुंबई: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे वयाच्या शंभराव्यावर्षी उपचारादरम्यान सोमवारी पुण्यात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पुरंदरे यांच्या कार्याचा गौरव करत शब्दांजली वाहिली. मात्र, आज पुन्हा राज ठाकरे यांनी पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. विशेष म्हणजे ठाकरे यांनी ही श्रद्धांजली व्यंगचित्राच्या माध्यमातून वाहिली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘शिवाज्ञा’ या व्यंगचित्रातून शिवशाही बाबासाहेब पुरंदरे यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. या व्यंगचित्रात छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आसनावरून बाबासाहेब पुरंदरेंचे स्वागत करताना दिसत आहेत. स्वागत करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला हात पुढे केला आहे. तर बाबासाहेब पुरंदरे दोन्ही हात जोडून महाराजांसमोर मोठ्या श्रद्धेने लवून उभे असलेले दिसत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेचे स्वागत करताना म्हणतात, ‘ये रे माझ्या गड्या, मला शोधण्यासाठी जगभर खूप पायपीट केलीस, अविश्रांत मेहनत घेतलीस, माझ्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलंस. ये आता जरा आराम कर.’
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुरंदरे यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. राज ठाकरे यांनी म्हटले की, ‘बाबासाहेबांनी आपलं आयुष्य शिवचरित्र सांगण्यासाठी खर्च केलं. परंतु असं असतानाही वर्तमानातील प्रश्न आणि भविष्यातील आव्हानं ह्याबाबत त्यांच्याकडून कायम मार्गदर्शन होत आले. माझ्या व्यक्तिगत आयुष्यात ते माझे मार्गदर्शक तर होतेच, परंतु मला पितृत्युल्य होते.बाबासाहेब मला नेहमी सांगत, महाराजांचा जिथे जिथे पदस्पर्श झाला, तिथे तिथे मी आजपर्यंत अनेकदा जाऊन आलो आहे. आता फक्त एकच जागा उरली आहे, महाराज जिथे गेलेत तिथे जायची. शिवछत्रपती महाराजांचा सेवक आज साक्षात छत्रपतींची सेवा करण्यासाठी निघाला. इतिहास संशोधक, शिवचरित्रकार, महाराष्ट्र भूषण सन्माननीय बाबासाहेब पुरंदरे, अशा शब्दात पुरंदरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांना विनम्र श्रद्धांजली.’
from https://ift.tt/3wTVhox