
पारनेर : आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था,नगरपंचायत व महानगर पालिका निवडणुकीत शिवसेना कदापीही भाजपसोबत युती करणार नसल्याचे सांगतानाच भाजपाचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केलेले विधान हे त्यांचे वैयक्तिक मत असून याला कोणताच अर्थ नसल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (दक्षिण) प्रा. शशिकांत गाडे यांनी ‘पारनेर दर्शन’शी बोलताना दिली.
भाजपाचे खासदार डॉ.सुजय विखे हे काल पारनेर तालुका दौऱ्यावर आले होते. त्यांच्या कार्यक्रमांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही हजेरी लावली होती.यावेळी बोलताना राज्यात कोणाचीही आघाडी होवो, पारनेर तालुक्यात मात्र भाजपा शिवसेना युती कायम राहणार असल्याचे विधान खासदार विखे यांनी केले होते.याविषयी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. गाडे यांनी ‘पारनेर दर्शन’शी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.
यासंदर्भात बोलताना प्रा. गाडे म्हणाले की, आगामी काळात होणाऱ्या निवडणूकांविषयी शिवसेना पक्षाची रणनीती ठरलेली आहे. नगर, सोलापूर आणि मराठवाडयाचे सेनेचे संपर्क नेते विश्वनाथ नेरूळकर यांच्याशी बैठक देखील झाली आहे. आगामी निवडणुका शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासमवेत लढण्याचे धोरण निश्चित झाले आहे. हा फॉर्म्युला लागू न पडल्यास शिवसेनेची स्वबळावर लढण्याची तयारी आहे मात्र, कोणत्याही परिस्थितीत भाजपाशी युती करायची नाही असे पक्षाचे धोरण ठरल्याचे प्रा. गाडे यांनी सांगितले.
भाजपाचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या कार्यक्रमांना पारनेर तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रा. गाडे म्हणाले की, कार्यक्रमांना उपस्थित राहणे वेगळे आणि निवडणुकीचे धोरण वेगळे असते असेही ते म्हणाले. पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा आणि निवडणुकांचा संबंध नसल्याचे गाडे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
कोणत्याही परिस्थितीत भाजपाला सोडून निवडणुका लढवण्याची रणनीती शिवसेनेने यापूर्वीच आखलेली आहे त्यामुळे भाजपाचे खासदार डॉ. विखे पाटील यांच्या बोलण्याला काहीच अर्थ नसल्याचे सांगताना प्रा. गाडे म्हणाले की, खासदार विखे हे प्रत्येक तालुक्यात वेगवेगळी विधाने करीत आहेत. नगर तालुक्यात झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना खासदार विखे म्हणाले की, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले कोणत्याही पक्षात गेले तरी आमची अंतर्गत युती कायम राहणार आहे. त्यांना आम्ही मदत करणार आणि ते आमदार होणारच अशा प्रकारचे विधान खासदार विखे यांनी केल्याचे प्रा. गाडे यांनी सांगत त्यांच्या बोलण्याला कोण रोखणार असा सवालही त्यांनी केला.
from Parner Darshan https://ift.tt/31nqkxv