दादरा -नगर हवेली : शिवसेनेच्या उमेदवार कला देलकर यांनी दादरा व नगर हवेली लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मोठ्या फरकाने विक्रमी विजय मिळवला आहे. काँग्रेस व भाजपसारख्या विरोधकांना मागे सोडत शिवसेनेने महाराष्ट्राबाहेर मिळवलेला हा पहिलाच मोठा विजय आहे. कला देलकर ह्या दादरा व नगर हवेलीचे माजी दिवंगत खासदार मोहनभाई देलकर यांच्या पत्नी आहेत.
कला देलकर यांनी भाजपचे महेश गावित व राष्ट्रीय काँग्रेसचे महेश धोडी यांचा संयुक्तपणे ५१,००९ मतांनी पराभव केला आहे. यामुळे एकअर्थी खासदारकीला गवसणी घालून शिवसेनेची दिवाळी जोमात साजरी होत आहे. अपक्ष म्हणून निवडून आलेले माजी खासदार मोहनभाई देलकर यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त होती.
यंदाच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात मोहन देलकर मुंबईतील एका खासगी हॉटेलमध्ये मृत अवस्थेत आढळले होते. त्यानंतर अलीकडेच पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कला देलकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.
२०१९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत मोहन देलकर यांनी अपक्ष निवडणूक लढवून तत्कालीन भाजपचे खासदार नथुभाई पटेल यांचा ९,००० मतांनी पराभव केला होता. ते एक लोकप्रिय स्थानिक नेते होते. स्थानिक प्रशासनाच्या मानसिक त्रासामुळे मोहन यांचा जीव गेला, असा आरोपही देलकर कुटुंबीयांनी लावला होता.
दरम्यान, २०१९ मध्ये अपक्ष निवडणूक लढवण्याआधी देलकर कधीकाळी भारतीय जनता पक्ष (भाजप) व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आयएनसी) पक्षातही कार्यरत होते.

from Parner Darshan https://ift.tt/3mzsQc6

By News

Leave a Reply

Your email address will not be published.