
सतीश डोंगरे
शिरूर : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी प्रा. सतीश कोळपे यांची निवड झाली आहे. प्रविणशेठ चोरडिया यांनी उपसभापती पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर ही निवड करण्यात आली.
शिरूर बाजार समितीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व असून, एकूण १८ पैकी १५ संचालक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. त्यामुळे ही निवड बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. सहा महिन्यांपूर्वीच ऑगस्ट महिन्यात श्री. चोरडिया यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड झाली होती. त्यावेळी प्रा.कोळपे हे ही या पदासाठी तीव्र इच्छुक होते मात्र पक्षाने त्यांना पुढच्या वेळी संधी देण्याचा शब्द दिला होता. त्यामुळे यावेळी प्रा.कोळपे हेच उपसभापती होणार हे रात्रीच स्पष्ट झाले होते. अपेक्षेप्रमाणे आज सकाळी १०:३० वाजता संचालक मंडळाच्या बैठकीत कोळपे यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली.
प्रा.कोळपे हे एक शांत संयमी व मनमिळाऊ कार्यकर्ते म्हणून त्यांची तालुक्यात ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी प्रामाणिक व आमदार अशोक पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांना ओळखले जाते. पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो.
“शिरूर बाजार समितीची विकासाची घोडदौड चालू असून यापुढे ही घोडदौड अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले जातील तसेच यापुढे शेतकरी वर्गाच्या हितासाठी आणि कल्याणासाठी निरनिराळे प्रयोग राबविण्याचा मानस आहे” अशी प्रतिक्रिया प्रा.कोळपे यांनी निवडीनंतर व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार अशोक पवार यांचेही त्यांनी यावेळी आभार मानले.
शिरूर पंचायत समितीचे सभापती म्हणून गुनाट गावचे बाजीराव कोळपे यांनी यापूर्वी काम पाहिले आहे. त्यानंतर खूप कालावधी नंतर आता त्यांचे सख्खे बंधू प्रा.सतीश कोळपे यांना बाजार समितीचे उपसभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यामुळे गुनाट गावाला दुसऱ्यांदा सभापतिपदाची संधी मिळाली आहे. त्यामुळे गुनाट ग्रामस्थांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला.
from https://ift.tt/ZQzoqJB