मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्यावर पत्रकार सुधीर भोंगळे यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये चांगलीच राजकीय टोलेबाजी पाहायला मिळाली. भोंगळेंनी पवारांच्या भाषणांचा संग्रह असलेलं ‘नेमकचि बोलणें’ या पुस्तकाचं लेखन केलं आहे. या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला. ‘नेमकचि बोलणें’ पुस्तक नरेंद्र मोदींना पाठवलं पाहिजे. नेमके बोलणें याची फोड करून त्यांना सांगू, असे राऊत म्हणाले. महाराष्ट्र देशाला सतत विचार देत असतो. शरद पवार नेहमी देशाला विचार देत असतात, असेही राऊत म्हणाले.
पुस्तकाच्या भगव्या रंगाच्या कव्हरवरुन बोलताना संजय राऊत म्हणाले की, तुमच्या विचाराला भगवे कव्हर घातलं आहे. हे सरकार बेरंग नाही. अवघा रंग एक झाला. महाविकास आघाडीचा जो ग्रंथ आपण निर्माण केला, त्याला आपण भगवं कव्हर घातले आहे, असे राऊत म्हणाले. मी शरद पवारांना बसायला खुर्ची का दिली यावर टीका करणाऱ्यांनी शरद पवार यांची 61 भाषणे वाचली पाहिजेत, असेही राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, भाजपाला देशाचं ऐक्य नको हे शरद पवार यांनी 25 वर्षापूर्वी सांगितले होते, आम्हाला 2 वर्षापूर्वी कळाले. आम्हाला हे कळालं आहे की भाजप देशाला किती मागे नेतोय हे त्यांनी 1996 च्या आसपास सांगितलं. प्रश्न विचारणाऱ्यांची काय अवस्था आहे, हे आपल्याला माहीत आहे. पण पवार साहेबांना प्रश्न विचारलेले आवडतात. उत्तर शोधायला त्यांना आवडतात. अनेक वर्षांपूर्वी भाजपला देश एकसंघ नको हे पवार यांनी सांगितलं, हे आत्ता आम्हाला आता समजलं, असंही ते म्हणाले. विचार मांडायचाच नाही ही प्रवृत्ती झुंडशाहीला बळ देणारी आहे.
राज्यात युतीच पहिलं सरकार होतं. त्याला पंतांचे सरकार असं शरद पवार म्हणाले होते पण ते ही ठाकरेंचे सरकार होते. सावरकर यांच्याबद्दल शरद पवार यांनी बारामतीत सुंदर भाषण केले. वैचारिक मतभेद असतानाही शरद पवारांनी स्तुती केली आहे.
यावेळी रंगनाथ पठारे, कवी किशोर कदम, सुधीर भोंगळे यांची उपस्थित होते. तर डॉ. विजय केळकर ऑनलाईन उपस्थित होते. तर शरद पवार, दिलीप वळसे, जयंत पाटील, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे देखील हॉलमध्ये उपस्थित होते.

from https://ift.tt/3dKCfZ0

By News

Leave a Reply

Your email address will not be published.