नाशिक : महापालिकेच्या क्षेत्रात लसीकरण झालेल्या नागरिकांची संख्या वाढावी, जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे, या दृष्टीने प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी काही मोठे निर्णय घेतले. त्यात लस नाही, तर पेट्रोल नाही; लस नाही तर कार्यालयांसह हॉटेल, चित्रपटगृह, नाट्यगृहातदेखील प्रवेश मिळणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
करोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाचे प्रमाण वाढणे गरजेचे आहे. त्यासाठी पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी काही निर्णय घेतले आहेत. घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी असे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. महापालिका क्षेत्रातील पेट्रोल पंपचालकांनी करोना प्रतिबंधासाठीची लस घेतलेल्यांनाच पेट्रोल द्यावे, लस घेतलेली नसेल, तर पेट्रोल देण्यात येऊ नये, असे आदेश प्रशासकांनी दिले आहेत. वाहनात पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्यांनी लस घेतली आहे, याची खातरजमा करूनच वाहनधारकांना पेट्रोल देण्यात यावे, असे प्रशासकांनी म्हटले आहे. पेट्रोल पंपचालकांनी स्वत:सह पंपावरील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे, लशीचे दोन्ही डोस त्यांनी घेतले आहेत, याची खात्री करावी, असे निर्देशदेखील त्यांनी दिले आहेत.
लस घेतलेली नसेल, तर महापालिकेसह शहरातील शासकीय, खासगी कार्यालय, जलतरण तलाव, योगा प्रशिक्षण संस्था, इन डोअर स्पोर्टस कॉम्पलेक्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स, कृषी उत्पन्न बाजार समिती, हॉटेल व्यावसायिक, मंगल कार्यालये, सर्व प्रकारची दुकाने, खासगी रुग्णालये, औद्योगिक आस्थापना, महाविद्यालये, सर्व माध्यमांच्या शाळा या ठिकाणी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी तसेच अन्य कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, अभ्यांगतांना करोना प्रतिबंधाची लस घेतली असेल, तरच प्रवेश देण्यात यावा असे पांडेय यांनी स्पष्ट केले आहे.
महापालिका कार्यालयातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन डोस घेणे बंधनकारक आहे. कर्मचाऱ्यांनी लशीचे दोन डोस घेतल्याची खातरजमा संबंधित विभागप्रमुखांनी करून घ्यावी. ३० नोव्हेंबर २०२१पर्यंत लसीचे दोन डोस घेतलेले असावेत. ज्यांच्या दुसऱ्या डोसची तारीख ३० नोव्हेंबर २०२१ नंतरची आहे, त्यांनाच या नियमातून वगळण्यात येईल असे पांडेय यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटनांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारादेखील त्यांनी दिला आहे.

from Parner Darshan https://ift.tt/3BEMHLe

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *