लतादिदींच्या जाण्यामुळे भारताचे वैभव हरपले !

Table of Contents

राळेगण सिद्धी : लतादिदींच्या जाण्यामुळे भारताचे सर्वात मोठे वैभव काळाच्या पडद्याआड गेले आहे. अशी गायिका पुन्हा होईल असे वाटत नाही. गाणारे लोक अनेक आहेत पण लतादिदींसारखा आवाज, गाण्यातील भाव आणि संदेश हे दुर्मिळ आहे.भारतातील सर्व भाषांमधून गाणी गाणाऱ्या त्या एकमेव गायिका असाव्यात. त्यांनी गायिलेली भक्तीगीते, भावगीते व देशभक्तीपर गीते ही सामान्य माणसांना आनंद आणि प्रेरणा देणारी होती. वेगवेगळ्या क्षेत्रात कष्ट करणाऱ्या श्रमिकांनी थकल्यानंतर लतादिदींचे गाणे ऐकले किंवा त्यांचा आवाज कानावर पडला की, क्षणात श्रमपरिहार होत असे अशा शब्दात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लता मंगेशकर यांना शब्दरूपी श्नद्धांजली अर्पण केली.
▪अण्णा म्हणतात की,
लतादिदींचा आणि माझा अनेक वेळा भेटण्याचा प्रसंग आला. त्यांच्या हस्ते मिळालेला जीवन गौरव पुरस्कार हा जीवनातील सर्वाधिक आनंदाचा क्षण होता. पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार मिळाला तेव्हाही एवढा आनंद झाला नसेल. त्यांनी गायिलेले ‘ए मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पानी, जो शहिद हुए हैं उनकी, जरा याद करो कुर्बानी’ हे गीत विसरणे कदापि शक्य नाही. हे गीत ऐकताना पंतप्रधानांच्या आणि उपस्थितांच्याही डोळ्यात पाणी आले होते. आजही ते गीत ऐकताना डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत. हे गाणे ऐकून लाखो लोकांच्या मनात देशभक्तीची प्रेरणा जागृत होते.
भगवतगीतेत श्रीकृष्णाने म्हटल्याप्रमाणे ‘अंतःकाळी जो माझे नामस्मरण करतो त्याचा पवित्र आत्मा मलाच येऊन मिळतो’ याप्रमाणे लतादिदींना चिरशांती मिळालेलीच आहे यात शंका नाही. लतादिदींना भावपूर्ण श्रद्धांजली.

from https://ift.tt/5jCnxg2

Leave a Comment

error: Content is protected !!