
मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळाचा लवकरच छोटा विस्तार होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची मंत्रीपदाची एक जागा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे रिकामी झाली आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडून भरली जाणार आहे. हा विस्तार हिवाळी अधिवेशनाच्या आधीच होऊ शकतो. दरम्यान मंत्रिमंडळात कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना स्थान मिळू शकते. थेट कॅबिनेट मंत्रीपदाची संधी त्यांना मिळू शकते अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
दिलीप वळसे पाटील यांच्याकडे अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर गृहविभागाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यामुळे रोहित पवार यांच्याकडे वळसे पाटील यांच्याकडे पूर्वी असलेले कामगार आणि उत्पादन शुल्क ही खाती दिली जाण्याची शक्यता आहे. अहमदनगरचे पालकमंत्रीपद भूषवण्यास हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरकडे दुर्लक्ष होत असल्याचे कारण सांगत नकार दिल्याचे कळते. त्यामुळे रोहित पवार यांच्याकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारीही दिली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
रोहित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिसऱ्या पिढीचे वारसदार म्हणून पाहिले जाते. तरुण चेहरा, आमदार झाल्यानंतर विकासाच्या मुद्यावर अॅक्टिव्ह असणे आदी मुद्दे रोहित पवार यांच्या बाजूने असल्याचे बोलले जाते. तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्षपदी संग्राम थोपटे यांची निवड होण्याची शक्यता आहे.
from https://ift.tt/3rDOkr8