
शिरूर : सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडून राज्यातील बैलगाडा शर्यतीची पहिली बारी आंबेगाव तालुक्यात रंगणार आहे. येत्या 1 जानेवारीला लांडेवाडी येथे हजारो बैलगाडा शौकिनांच्या उपस्थितीत हा थरार रंगणार आहे. वाद्यांच्या ताफ्यात माजी खासदार व शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते पहिली बारी जुंपण्यात येणार आहे. सध्या या शर्यतीची जय्यत तयारी चालू आहे.
लांडेवाडी , कोळवाडी येथे नव्याने बनविण्यात आलेल्या सर्व सोयीसुविधांनीयुक्त घाटात हा बैलगाडा शर्यतींचा ‘उचल की टाक’ थरार रंगणार आहे. गेले काही दिवस युध्दपातळीवर या घाटाचे काम चालू होते ते आता पूर्णत्वास आले आहे. किरकोळ रंगरंगोटीचे काम सध्या घाटात चालू आहे.
बैलगाडा शर्यतींसाठी बक्षिसांची खैरात करण्यात आली आहे. पहिले बक्षीस 1 लाख रुपये, दुसरे बक्षीस 75 हजार, तिसरे बक्षीस 50 हजार रुपये याशिवाय मोटरसायकल, अंगठ्या, टि व्ही, रेफ्रिजरेटर, दोन जुंपते गाडे, आकर्षक ट्रॉफी आदी बक्षीसांची रेलचेल आहे.
बैलगाडा शर्यतींना न्यायालयाने काही नियम व अटींवर सशर्त परवानगी दिल्यानंतर कायदेशीर बाबींची पूर्तता करुन सध्या राज्यभर शर्यती भरविण्यासाठी धावाधाव चालू असतांना बंदीनंतर राज्यातील पहिली बैलगाडा शर्यत भरविण्याचा मान लांडेवाडीला मिळाला आहे. त्यामुळे या शर्यतीबद्दल
सर्वत्र मोठी उत्सुकता आहे.
“ बैलगाडा शर्यतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली असून सर्व नियम आणि अटींचे पालन करून आम्ही शर्यती पार पाडणार आहोत. या शर्यती कायमस्वरूपी चालू रहाव्यात यासाठी सर्व बैलगाडा मालकांनी ही शासनाच्या नियमांचे पालन करून आम्हाला सहकार्य करावे,”
शिवाजीराव आढळराव पाटील
माजी खासदार
from https://ift.tt/3EuKaog