
मुंबई : कोरोना रुग्णांचे आकडे कमी होताच उर्वरित निर्बंध कमी केले जाण्याची शक्यता आहे. विशेषत: जमावबंदी आणि संचारबंदी मागे घेतली जाणार आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली आहे. मास्क लावण्याचे बंधन कायम ठेवून, ते न पाळणाऱ्यांविरोधात दंडही वसूल करण्याच्या नियमावर मात्र सरकार अद्यापही ठाम आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर विशेषत: ओमिक्रॉनचे रुग्ण वाढल्याने गेल्या सव्वा महिन्यांपूर्वी व्यवहारांवर मर्यादा आणल्या होत्या. याच काळात शाळा-महाविद्यालये बंद करून, विवाह, अत्यंविधीपासून काही कार्यक्रमांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात आले होते. परंतु, गेल्या १० दिवसांत रोजच कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत.
मुंबई, पुण्यातही रोजची रुग्णसंख्या हजाराच्या घरात आली आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी शाळा, महाविद्यायालये सुरू केली असून, कार्यक्रमांसाठी लोकांच्या उपस्थितीची मर्यादाही वाढविली आहे. तर उर्वरित निर्बंधही कमी करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली.
त्यानुसार पुढील काही दिवस कोरोना संसर्गाची स्थिती पाहून संचारबंदी, जमावबंदी मागे घेतली जाईल आणि हॉटेलसाठीच्या वेळा वाढविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भातील नव्याने जिल्हानिहाय आढावा घेऊन पुढील कार्यवाही होणार आहे. त्यामुळे निर्बंध लागू असलेल्या व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे. मास्क वापरण्याचे बंधन नसावे, अशी भूमिका घेण्यात आली होती. मात्र, त्याबाबत तडजोड न करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमत झाले आहे. त्यामुळे मास्क वापरणे बंधनकारकच राहणार आहे.
from https://ift.tt/Xm7IfVu