राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा !

Table of Contents

जालना : राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना न्यायालयाने दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात बच्चू कडू यांनी मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने हा निकाल दिला असून जामीनही मंजूर कऱण्यात आला आहे. भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती.
दरम्यान बच्चू कडू यांनी न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली असून चुकीच्या निर्णयाचे स्वागत करतो असे म्हटले आहे. “२०१४ विधानसभा निवडणुकीसाठी २०१४ मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना मुंबईच्या या घरावर आम्ही कर्ज घेतले होते. त्या घराचा उल्लेख करण्याऐवजी कर्ज घेतलेल्या रकमेचा उल्लेख केला होता. हा काही गंभीर प्रकार नव्हता. मात्र या प्रकरणात न्यायालयाने आज जो काही चुकीचा निर्णय दिला आहे त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो,” असे बच्चू कडू म्हणाले.
“२०१४ च्या आधी राज्य सरकारने आमदारांची एक सोसायटी गठीत केली होती. त्यावेळी राज्य सरकारने सर्व आमदारांना कर्जाची हमी घेत घरे दिली होती. त्याच घरावर कर्ज काढले होते. त्या घऱाच्या कर्जाची रक्कम उमेदवारी अर्जावर टाकली गेली, मात्र घर आणि घराचा क्रमांक देण्यास विसरलो होतो. हे काही जाणुनबुजून केलेले नव्हते. कर्जाचे घर दाखवलेच आहे. पण न्यायालयाने दिलेल्या चुकीच्या निर्णयाचे आम्ही स्वागतच करतो. चुकीचा निर्णय दिला तरी न्यायालयाचा सन्मान करायचा असतो,” असे बच्चू कडू म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “हा संपूर्ण प्रकार अचलपूरला घडला आणि या प्रकरणाची तक्रार चांदूर बाजार येथील व्यक्तीने आसेगाव येथील पोलीस ठाण्यात दिली होती. ज्या पोलीस अधिकाऱ्याने एका गरीब माणसाला २० हजार घेऊन लुबाडले होते, त्याला आम्ही आमच्या पद्धतीने धडा शिकवला होता. म्हणून त्याने हा डाव केला. आसेगावला त्याने तक्रार घेतली, दुसरा एक विरोधक उभा करत केस केली. जामीन मिळाला असून आता वरच्या न्यायालयात आम्ही जाणार आहोत. वरच्या न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल,” असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.
▪नेमकं काय आहे प्रकरण ?
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगाला आपल्या संपत्तीची माहिती देणारे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. यात त्यांनी त्यांच्या मुंबईतील फ्लॅटची कोणतीही माहिती दिली नव्हती. याविरोधात अमरावतीतील अचलपूरचे भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी तक्रार दाखल केली. या खटल्यात चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने निकाल दिला.

from https://ift.tt/POi6lu8

Leave a Comment

error: Content is protected !!