
सतीश डोंगरे
शिरूर : लोकनाट्य तमाशा मंडळाचे कार्यक्रम खुल्या मैदानात करण्यास राज्याच्या मदत पुनर्वसन विभागाने परवानगी दिली आहे. याबाबतचे परिपत्रक पोलिस महासंचालकांनी काढले आहे. मात्र, लोकनाट्य तमाशा मंडळाचे कार्यक्रम करण्यास स्थानिक पोलीस प्रशासन परवानगी नाकारत आहेत. याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय न झाल्यास १५ डिसेंबर रोजी राज्यातील तमाशा फडमालक व कलावंत सोलापूर जिल्ह्यातील कऱ्हाड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाजवळ जमा होतील, असा इशारा मराठा तमाशा लोककलावंत परिषदेचे अध्यक्ष संभाजी जाधव यांनी दिला आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोकनाट्य तमाशा मंडळाचे कार्यक्रम खुल्या मैदानात करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. याबाबतचे परिपत्रक ३० नोव्हेंबर रोजी पोलिस महासंचालकांनी काढून जिल्हा पोलिस अधीक्षकांनाही पाठवले आहे. त्यामुळे लोकनाट्य तमाशा मंडळाचे कार्यक्रम करण्याची तयारी राज्यातील तंबूच्या फडमालकांनी केली.
मात्र, लोकनाट्य तमाशा मंडळाचे कार्यक्रम करण्यास तालुक्यातील स्थानिक पोलिस प्रशासन परवानगी देत नाही. परवानगीसाठी केलेल्या अर्जाची पोहोचसुद्धा फडमालकांना दिली जात नाही. का परवानगी नाकारली याबाबतचे कारणसुद्धा सांगितले जात नाही.
याबाबत नुकतीच गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची फडमालकांनी भेट घेतली. त्यानंतर पोलिस महासंचालकांनी २ डिसेंबर रोजी सुधारित परिपत्रक काढून पश्चिम, उत्तर महाराष्ट्र, ठाणे जिल्हा, खानदेश, विदर्भ, मराठवाडा आदी भागात लोकनाट्याचे कार्यक्रम करण्यास परवानगी दिली. मात्र, त्यानंतरसुद्धा राज्यातील तालुकास्तरीय पोलिस ठाण्यातून परवानगी नाकारली जात आहे.
त्यामुळे फडमालक व कलावंत मानसिक तणावाखाली आहेत.
from https://ift.tt/3oOM7aJ