शिरूर : सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. हरी नरके यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. “खरंतर हजारे आमचे शेजारी आहेत. (मी शिरूरचा ते पारनेरचे. आमच्यामध्ये घोडनदी आहे) आमचे आम्ही बघून घेऊ ना! “बीच मे मेरा चांदभाई” ही भूमिका घ्यायची विश्वंभरबापूंना गरजच काय?” अशा शब्दांत प्रा.नरके यांनी चौधरी यांना टोला लगावला आहे. 
याबाबत प्रा.नरके यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली असून सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
प्रा. नरके यांनी या पोस्टमध्ये नेमके काय म्हटले आहे ते पाहूया.
माझे सन्मित्र विश्वंभर चौधरी सतत प्रसिद्धीच्या झोतात असतात. ठाकरे सरकारच्या समितीवर काम करायचे नी महाविकास आघाडीच्या प्रत्येक निर्णयावर तुटून पडायचे ही यांची रीत. समितीवर आहात म्हणजे सरकारच्या आरत्याच ओवाळल्या पाहिजेत असे मी मानत नाही. सरकारच्या चुकीच्या निर्णयांवर घटनेच्या चौकटीत टीका जरूर करावी. पण आपण कुणाचे मिंधे नाही अशी गर्जना करीत इतरांना “राजाश्रयवाले” असे हिणवायचे तर मग स्वतः “राजाश्रय” टाळला पाहिजे. दुसऱ्यांना हिणवायचे नी स्वतः मात्र “राजाश्रय” घ्यायचा हे वागणे विसंगत होय. आणि ज्या सरकारचे काहीच पटत नसेल त्याने दिलेल्या पदाचा सरळ त्याग करून निःस्पृहपणे सरकारवर दररोज आसूड ओढावेत.
आपण लोकशाहीवादी, परमतसहिष्णू, विवेकी, संवादी, पुरोगामी असल्याची प्रतिमा त्यांनी प्रयत्नपूर्वक तयार केलीय. त्यांना पाठींबा देणारा वर्ग बघितला तर उच्चपदस्थ संघवाले, संस्कारित समाजवादी, डावे, बिनबुडाचे, आपण कुठले ते कळू न देणारे नी भोळेभाबडे बहुजन असे सगळे त्यात दिसतील.
१) दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेताच चौधरी त्यावर तुटून पडले. किरीट सोमय्या मराठी विरुद्ध कोर्टात जातात, हे मराठी पाट्यांवर तुटून पडतात. मी मराठी भाषेचा अभिमानी असल्याने मला त्यांच्याविरुद्ध लिहिणे भाग पडले. तर ते रागावले.
२) २४ ×३६५ अहोरात्र किरीट सोमय्याचे स्वातंत्र्य व अण्णा हजारे यांची प्रत्येक कृती यांचे समर्थन करणाऱ्या, भाषेचे व्याकरण इतरांना शिकवणाऱ्या चौधरींनी किरण मानेंच्या ज्या शब्दांवरून त्यांच्याविरुद्ध अभियान सुरू केले, ते स्वातंत्र्य अमोल कोल्हे यांना मात्र त्यांनी नाकारले. तेच असंसदीय शब्द जेव्हा यांच्या लाडक्या देवेंद्रजीच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी वापरले तेव्हा मात्र त्या शब्दांवर मौन धारण करीत बाईने नामर्द शब्द वापरू नयेत अशी कोमट पोस्ट ते टाकते झाले. असा भेदभाव का?
३) अण्णा हजारे यांनी सात वर्षाच्या झोपेतून जागे होत शुद्धताचार्य असलेल्या केंद्रीय गृहमंत्र्यांना राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या चौकशीचे पत्र लिहिले तेव्हा अण्णा हे सोमय्या यांच्याच छावणीतले स्वयंसेवक असल्याचे उपरोधाने मी त्यांची नावे बदलून लिहिले. तर विश्वंभर अपार चवताळले. माझ्यावर तुटून पडले.
खरंतर हजारे आमचे शेजारी आहेत. (मी शिरूरचा ते पारनेरचे. आमच्यामध्ये घोडनदी आहे) आमचे आम्ही बघून घेऊ ना! “बीच मे मेरा चांदभाई” ही भूमिका घ्यायची विश्वंभरबापूंना गरजच काय?
४) सावित्रीबाई फुले यांचे नाव पुणे विद्यापीठाला द्यायला विरोध करणारा लेख चौधरींनी चवताळून लिहिला. तेव्हा “सावित्रीला नकार, गर्जे विश्वंभर” असा सणसणीत प्रतिवाद मला करावा लागला होता. त्यांच्या सावित्रीबाई फुले विरोधी अभियानाचा पार बोऱ्या वाजला. कोणाचीच साथ न मिळाल्याने ते एकटे पडले आणि तो राग त्यांनी तेव्हा मनात दाबून ठेवला.
५) आमच्या प्रयत्नांनी विद्यापीठात सावित्रीबाईंचा पुतळा बसला आणि विश्वंभरबुवांचा तो दाबून ठेवलेला परिवर्तनवाद्यांवरचा राग उफाळून वर आला. एरवी सहिष्णुता, विवेक, संवाद, लोकशाही असा अहोरात्र रतीब घालणारे चौधरी आपला तोलच घालवून बसले नी मैत्री तोडायची जाहीर धमकी फेसबुकवर देऊ लागले. त्यावर मीडियात लेखही आले. मतभेद होते, आहेत पण म्हणून मैत्री का तोडायची? मग आगरकरी बाणा “विचारकलहाला घाबरू नका” चे काय? संवाद तोडून वैर करणे ही कोणती लोकशाहीरीत?
६) सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण चौधरींच्या सर्वात लाडक्या राज्यपालांच्या हस्ते झाले नी त्याच दिवशी चौधरींनी मला त्यांच्या मित्रयादीतून काढून टाकले.
७) मी त्यांना मित्रयादीतून वगळलेले नाही. त्यांनी मला मित्रयादीतून बाहेर काढलंय हे मित्रांना कळावे यासाठी ही पोस्ट!
: प्रा. हरी नरके

from https://ift.tt/BEXjyQO

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *