
जालना : मुंबईसह राज्यभरात वाढलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आता हळुहळू कमी होऊ लागला आहे. रुग्णसंख्याही घटत असून, विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तिसरी लाट संपेल’ असे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
जालन्यातील एका कार्यक्रमाला राजेश टोपे उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘दोन दिवसाखाली राज्यातील कोरोना परिस्थितीवर मंत्रीमंडळाची आढावा बैठक झाली. गेल्या काही दिवसात राज्यातील कोरोना आकडेवारीमध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे. राज्यात ४८ हजार दैनंदिन रुग्णसंख्या आढळणारी आता १० ते १५ हजारांवर आली आहे’, असे राजेश टोपे यांनी सांगितले.
‘ज्याठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आढळत होती, तिथेही रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरातील दैनंदिन रुग्णसंख्या ५००-६००वर आली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांचा आलेख कमी होत आहे. त्यामुळे मार्च महिन्यापर्यंत आपण राज्यातील कोरोनाची तिसरी लाट ओसरण्याची शक्यता आहे. ज्याठिकाणी कोरोना रुग्णसंख्या वाढली नव्हती, त्याठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढेल अन् कमीही होईल’, असेही राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
सध्याच्या परिस्थितीत कोणतेही निर्बंध वाढवण्याचा राज्य सरकारचा विचार नाही. शासनाचा कल निर्बंध कमी करण्याकडे आहे. दर आठवड्याला निर्बध टप्प्या टप्याने कमी झालेले पाहायला मिळतील. राज्यात लावण्यात आलेल्या सर्व निर्बंधावर बैठकीत चर्चा झाली.
काही ठिकाणी निर्बंध कमीही केले आहेत. यापुढेही टप्याटप्याने निर्बंध कमी केले जातील. तज्ञांच्या माहितीनुसार तिसरी लाट मार्च महिन्याच्या मध्यात संपुष्टात येणार आहे, त्यामुळे शासनाचा कल निर्बध कमी करण्याकडे असेल असेही टोपे यावेळी म्हणाले.
from https://ift.tt/Vr5kS71