मायभूमीच्या सन्मानाने भारावले भुमिपूत्र अधिकारी ! 

 

Table of Contents

पारनेर : राज्यात तसेच परराज्यात उच्च पदांवर कार्यरत असलेले अधिकारी मातृभूमीत झालेल्या सन्मानाने भारावून गेले.आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून, निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने तालुक्यातील उच्चपदस्थांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्यात भूमीपुत्रांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
महाराष्ट्रासह,गुजरात तसेच विविध राज्यात कर्तव्य बजावत असलेले भारतीय प्रशासकीय सेवा,भारतीय पोलीस सेवा,भारतीय महसूल सेवांसह प्रशासनातील उच्च पदांवर कार्यरत असणारे तब्बल १५५ भूमीपुत्र या स्नेह मेळाव्यास उपस्थित होते.
नाशिक विभागीय महसूल उपायुक्त गोरक्षनाथ गाडीलकर,ठाण्याचे पोलीस उपायुक्त सुभाष पठारे,वाहन निरीक्षक पद्माकर भालेकर,निवृत्त पोलीस उपायुक्त राम पठारे, भारतीय पोलीस सेवेत नुकतीच निवड झालेले दैठणे गुंजाळ येथील सूरज गुंजाळ, अहमदाबाद (गुजरात) येथे वस्तू व सेवा कर आयुक्त म्हणून कार्यरत असलेले योगेश उंडे,विक्रीकर आयुक्त विष्णू औटी, निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापू शिर्के,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे,सुदाम पवार,वकील राहुल झावरे, संदीप चौधरी यांचा उपस्थितांमध्ये समावेश होता.
यावेळी बोलताना आमदार नीलेश लंके म्हणाले की,तालुक्यातील शेती पावसावरच अवलंबून आहे.राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा दुष्काळी तालुका म्हणून तालुक्याची ओळख आहे.या पार्श्वभूमीवर तालुक्यातील तरूणांपुढे शिक्षणाशिवाय पर्याय नाही.तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीवर मात करून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेतच मात्र कुटूंबातील सर्वांनी शेतीवर अवलंबून राहण्याऐवजी नोकरी,व्यवसायाचा पर्याय निवडणे आवश्यक असल्याचे आमदार लंके म्हणाले.
तालुक्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तालुक्यातच सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी निघोज येथे सुमारे एक कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेल्या अभ्यासिकेचे काम प्रगतीपथावर आहे‌.आणखी एक कोटी रुपये खर्च करून स्पर्धा परीक्षांची पुस्तके, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.तालुका बुध्दीवंतांची खाण आहे.त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे.विविध उच्च पदांवर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी दर रविवारी तालुक्यात येऊन स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे असे आवाहन आमदार लंके यांनी केले.
निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने तालुक्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची माहिती संकलित करण्यासाठी समाज माध्यमातून आवाहन करण्यात आले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत सुमारे २५० अधिकाऱ्यांची माहिती संकलित झाली.त्यांना स्नेह मेळाव्यासाठी आमंत्रित करण्यात आले.त्यापैकी १५५ अधिकारी मेळाव्यास उपस्थित होते.तालुक्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची संख्या पहाता पारनेर तालुका प्रशासनाच्या माध्यमातून राज्य चालवत असल्याची मिश्किल टिप्पणी आमदार लंके यांनी केली.

from Parner Darshan https://ift.tt/3kaAk3t

Leave a Comment

error: Content is protected !!