पुणे: पुण्यासारख्या शहरात उच्चभ्रू वस्ती वाढू लागली आहे. अशावेळी चोरीच्या घटनाही वाढत आहेत. मात्र, पुण्यात आता अशी घटना समोर आली आहे की, ज्यामुळे पुणे पोलीसही चक्रावून गेले आहेत. पुण्यात दोन अशा चोरांना अटक करण्यात आली आहे की, जे थेट विमानाने पुण्यात येऊन चोरी करायचे. परराज्यातील हे श्रीमंत चोर अतिशय शिताफिने पुण्यात चोरी करुन पुन्हा विमानाने आपल्या राज्यात निघून जायचे.विमानाने पळून जाणारे चोर नेमके कसे सापडले पुणे पोलिसांच्या ताब्यात?
पुणे शहरात घडत असलेल्या घरफोडीबाबत पोलिसांना गुप्त माहिती बातमी मिळाली की, 509 चौक, लोहगाव येथे दोन संशयित इसम थांबलेले आहेत. याच दोघांनी पुणे शहरातील विश्रांतवाडी, धानोरी परिसरात घरफोडया केल्याची माहितीही यावेळी पोलिसांना मिळाली. पुण्यात धुमाकूळ घालणारे हे चोर चोरी करताच विमानाने पळून जायचे. त्यामुळे अनेक दिवस ते पुणे पोलिसांच्या हाती लागत नव्हते. मात्र, यावेळी खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांच्या टीमने सापळा रचून दोन्ही संशयितांना मोठ्या शिताफिने अटक केली.
यानंतर दोन्ही आरोपींना पुणे शहर गुन्हे शाखा युनिट 4 कार्यालय येथे आणून त्यांची सखोल चौकशी केली. ज्यामध्ये अशी माहिती मिळाली की, आरोपी परवेज शेर मोहम्मद खान (वय 43 वर्षे) हा ग्रेटर नोयडा, उत्तर प्रदेशमध्ये राहत होता. ज्याचा कपडे विक्रीचा व्यवसाय होता. तर दुसरा आरोपी तस्लीम अरिफ समशुल खान (वय 23 वर्षे) हा देखील अलिगंज उत्तरप्रदेश येथे राहणारा आहे.आरोपींची पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपींची अधिक चौकशी केली. ज्यानंतर विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या क्षेत्रात घरफोडी केल्याचे कबूल करुन समक्ष ठिकाणे देखील आरोपींनी पोलिसांना दाखविली.त्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम 454, 457, 380, 34 प्रमाणे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यावेळी आरोपींनी गुन्हयात चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ज्यात 130 ग्रॅम सोने (ज्याची किंमत रुपये 6,37,000) सापडले आहे.सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सह पोलीस आयुक्त गुन्हे-2 लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर यांच्या सूचनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, राजस शेख, राकेश खुणवे, अशोक शेलार, रमेश राठोड यांनी पार पाडली.

from https://ift.tt/3JlIilC

By News

Leave a Reply

Your email address will not be published.