
राळेगणसिद्धी : कोरोनाचा संसर्ग सध्या जरी कमी जाणवत असला तरी मागील काही दिवसांमध्ये कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती संपर्ण जगाने अनुभवली आहे. या दरम्यान रुग्णांना रक्ताची गरज मोठ्या प्रमाणात भासत होती. तसेच कोरोनासारख्या आजारामुळे म्युकरमायकोसीस यासारख्या आजारांचे प्रमाण वाढताना दिसत होते. अशा कठीण काळाचे महत्व लक्षात घेऊनच जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई हजारे यांच्या १९ व्या स्मृतिदिनानिमित्त राळेगणसिद्धी परिवाराने नेत्र व रक्तदान शिबीराचा घेतलेला कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे अशी प्रतिक्रिया पद्मश्री तात्याराव लहाने यांनी दिली.
या शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. मातोश्री लक्ष्मीबाई हजारे यांच्या स्मृतिदिनानिमित्त राळेगणसिद्धी परिवार दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. या दोन्ही उपक्रमांचे दि. १९ नोव्हेंबर रोजी राळेगणसिद्धी येथील पद्मावती मंदिर परीसरात सकाळी १० वाजता प्रारंभ होईल.
नेत्र शिबीरासाठी प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख हे रुग्णांची मोफत तपासणी करून उपचार करणार आहेत. तर रक्तदान शिबिरासाठी पुणे येथील मोरया रक्तपेढी यांचे सहकार्य लाभणार असल्याची माहिती सरपंच लाभेष औटी व माजी सरपंच जयसिंग मापारी यांनी दिली.
मातोश्री लक्ष्मीबाई हजारे यांच्या १९ व्या स्मृतीदिनानिमित्त भावपूर्ण कविता व गजलांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नितीन देशमुख, भरत दौंडकर, अनंत राऊत, आबेद शेख हे कवी उपस्थित राहणार आहेत. काव्यसंध्येचा कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता हिंद स्वराज ट्रस्ट येथील फिरोदिया सभागृहात आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला काव्य रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन उद्योजक सुरेश पठारे यांनी केले.
from Parner Darshan https://ift.tt/30quSmm