
एक लहान मुलगा शाळेतून मधेच घरी आला,म्हणाला पोट दुखतय.मग त्याला त्याचे आजोबा म्हणाले दवाखान्यात जाऊ तर म्हणाला नको गार्डनमधे चला.मग ते त्याला गार्डनमधे घेऊन गेले. आजोबांनी त्याचे शिक्षक समोरुन येताना पाहिजे.तेव्हा ते नातवाला म्हणाले अरे तुझे शिक्षक इकडेच येत आहेत. तु तर पोट दुखतय म्हणून घरी आला आता इथे खेळताना पाहिल्यावर काय म्हणतील?लपुन तर बस थोडावेळ. तेव्हा तो म्हणाला आजोबा तुम्हीच लपुन बसा.मी शाळेत गुरुजींना सांगितले की माझे अजोबा देवाघरी गेले.मग मला लगेच त्यांनी घरी पाठवले.
सज्जनहो हा धडा लहानपणीच गिरवला गेला आहे. त्यामुळे वयपरत्वे त्यात सुधारणा होत गेल्या.परिस्थितीचा लाभ कसा उठवायचा हे सांगावं लागत नाही. एका कंपनीतील कर्मचाऱ्याने वडीलांचे निधन झाले म्हणून दहा दिवसांची रजा मागितली.तसा रजेचा अर्ज दिला.तेव्हा साहेबांनी गेल्या पाच वर्षातले तीन रजेचे अर्ज त्याच्यापुढे ठेवले.जे वडिलांचे निधन झाले म्हणून रजा मागितलेले होते.निमित्तानं जगण्यातच भलाई आहे असा गुप्त संदेश बहुतांश पाळला जातो.काही देणेदारी असली आणि मार्च महिना असेल तर,अगदी बँकिग व्यवहाराशी फार संबंध न येणारा माणुस सुद्धा सहज कारण देतो,सध्या मार्च एंडमुळे नाही जमणार.एखाद्या कार्यक्रमात पोहोचायचे नसेल तर,माझी तब्येत बरोबर नाही, घरी पाहुणे येणार आहेत अशी गुळगुळीत कारणं आपण बरेचदा देतो.हे आपण खोटंनाटं करतोय याचं काही वाटतही नाही.
ही आपली वागण्याची तऱ्हा पाहुन आपली मुलं जेव्हा अशी गुळगुळीत कारणं देतात ना तेव्हा त्याची दाहकता कळते.
एक वयस्कर बाबा घरात काही वादावादी झाल्याने घर सोडून चार सहा दिवस असेच फिरत होते.त्यांना कुणीतरी आश्रमाची माहिती दिली असावी.त्या दिवशी पाऊस पडत होता.डोक्यात प्लास्टिक पिशवी घातलेली,अंगावर एक फाटका रग पांघरलेल्या अवस्थेत बाबा आश्रमाच्या दारात आले आणि म्हणाले आजची रात्र मला इथं आसरा मिळलं का? बाबांना आम्ही आश्रमात घेतले,जेवण झाल्यावर थोडी माहितीवजा विचारपूस सुरू केली.
तेव्हा ते म्हणाले,”मुलगा खूप चांगला आहे हो,पण त्याचं बायकोपुढे काही चालत नाही.खूप कष्टातुन मी प्रपंच उभा केला,त्याची आई तो लहान असताना वारली,पण त्याला आईची कमी कधी जाणवु दिली नाही.मुलाला भरपूर शिकवले,तो चांगल्या नोकरीला आहे.शेतीवाडी आहे. पण आता माझं वय झालं,काम होत नाही.कायमच किरकिर,भांडणं यामुळे मी घर सोडलं आहे माझा मुलगा मला नक्की शोधीत असेल.”मग त्या गावातील सरपंचांशी संपर्क करुन मुलाचा मोबाईल नंबर मिळवला.त्याला फोन केला,बाबांना ऐकायला कमी येत असल्याने स्पिकरफोन ऑन केला.मुलाला आम्ही सांगितले की आपले वडील आश्रमात आले आहेत. तुम्ही त्यांना न्यायला या.त्यावर तो म्हणाला,”मी सध्या बाहेर आहे, पण तुम्ही सांभाळीत असले तर ठेवून घ्या त्यांच्यावाचुन इकडं काही खोळंबा नाही.” हे उत्तर ऐकून त्यांच्या डोळ्याला अश्रुंच्या धारा लागल्या.आता बोलणं थांबलं होतं. एका बापाची गरज आता संपली होती,त्याचं कमावणं थांबलं होतं,कारण तो वृद्ध झाला होता.मुलगा सोईनुसार वागला होता.प्रत्येक गोष्ट सोईची करुन जगण्यात तो तरबेज झाला होता हेच खरं.
छोट्या छोट्या गोष्टी गरज नसताना सोईच्या करुन जगणं एक दिवस मोठ्या गोष्टी सोईच्या करुन जगण्याणी हिम्मत देतात.पण त्यानं माणुसकी आणि माणुसपण दोहोंची हत्या होते.
तुकोबाराय म्हणतात, आपुले मरण पाहिले म्या डोळा।तो जाला सोहळा अनुपम्य।। हा अनुपम्य सोहळा आम्हाला अनुभवता येणार नाही. कारण तुकोबारायांनी जीवनात कधीच आपली सोय पाहिली नाही. कोणतीही गोष्ट आपल्या सोईसाठी बदलली नाही.जगायचं कसं हे त्यांनी जगुन दाखवलं. इथं मात्र आपण स्वतःच्या स्वार्थासाठी सोईचं वागुन कधीतरी स्वतःच्याच विचारांची झालेली हत्या पाहुन व्यथित होतो.तो आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलेला मृत्यूच आहे. त्यात सोहळा शब्द येण्यासाठी खूप काही बदलावं लागेल.
सोईच्या नसणाऱ्या गोष्टी सोईच्या करुन जगावं लागेल.
रामकृष्णहरी
from Parner Darshan https://ift.tt/3wCopke