भाजपा -शिवसेना पुन्हा एकत्र येणार ?

Table of Contents

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कारकिर्दीस लवकरच अडीच वर्षे पूर्ण होत आहेत. भाजप आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रीपदाचे सम-समान वाटप म्हणजे अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यास नकार दिल्याने युती तुटली. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले अन् मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. त्यामुळे, भाजप शिवसेना पुन्हा एकत्र येणार का? असा प्रश्नही सातत्याने चर्चिला जात आहे. 
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जास्त काळ टिकणार नाही. अडीच वर्षे पूर्ण होताच पुन्हा शिवसेना आणि भाजप एकत्र येतील. मार्च किंवा एप्रिल महिन्यात राज्यात सत्ता बदल होईल, असे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले होते. तर, महाविकास आघाडीचे सरकार लवकरच कोसळेल, असा दावाही अनेक भाजपा नेत्यांकडून होत असतो. मात्र, आता शिवसेनेचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपा-शिवसेना एकत्र येण्यासंदर्भात महत्वाचे विधान केले आहे. गडकरी राज्यात आले तर शिवसेना-भाजपचे मने जुळतील का? असा प्रश्न मंत्री अब्दुल सत्तार यांना एका मराठी वृत्तवाहिनीवर विचारण्यात आला होता. त्यावर, नितीन गडकरी ज्यादिवशी मनं जुळविण्याचा निर्णय घेतील, त्यादिवशी खरोखर मनं जुळतील, असे सत्तार यांनी म्हटले आहे.
अब्दुल सत्तार हे दिल्ली गेले होते, तेथे त्यांनी महत्त्वाच्या मंत्र्यांच्या भेटीही घेतल्या. शिवसेनेचे वरिष्ठ नेते ज्यादिवशी निर्णय घेतील आणि नितीन गडकरी व अमित शहा यांनी पुढाकार घेतल्यास काहीही होऊ शकते. मी शिवसेनेचा साधा कार्यकर्ता आहे, पण भविष्यात युतीचा प्रस्ताव गेला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आणखी पुढील अडीच वर्षे देण्याचा प्रस्ताव ठेवल्यास निश्चितच विचार विनिमय होऊ शकतो, असेही अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. तसेच, महाराष्ट्रात भविष्यात कुठलंही परिवर्तन करायची असल्यास, त्याची चावी म्हणजे नितीन गडकरी, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेनेने बाहेर पडून भाजपसोबत यावे, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यापूर्वी म्हटले होते. त्यामुळे, महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्यात काय घडणार, हे पाहाणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

from https://ift.tt/3pV4ICh

Leave a Comment

error: Content is protected !!