अहमदनगर : माजी नगरसेवक कैलास गिरवले यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर काठीने मारहाण केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्कालीन कर्मचार्‍यासह दोघांविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात काल (मंगळवारी) गुन्हा दाखल झाला आहे.
तत्कालीन पोलीस नाईक रवींद्र आबासाहेब कर्डिले व सध्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलीस नाईक विजय महादेव ठोंबरे अशी गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचार्‍यांची नावे आहेत. याबाबत पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाच्या पोलीस उपअधीक्षक वैशाली मुळे यांनी फिर्याद दिली आहे. सीआयडी चौकशीनंतर मंगळवारी दुपारी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील तोडफोड प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दाखल गुन्ह्यात कैलास रामभाऊ गिरवले यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासकामी ८ एप्रिल २०१८ रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास चौकशीसाठी त्यांच्या राहत्या घरून एलसीबी कार्यालयात आणले होते.
एलसीबी कार्यालयातील साध्या वेशातील पोलिस कर्मचारी कर्डिले व ठोंबरे यांनी कैलास गिरवले यांना काठीने मारहाण करून दुखापत केल्याची असल्याचे सीसीटिव्ही फुटेज कॅमेरा नं.1 मध्ये तपासात निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील तोडफोड प्रकरणी कोठडीत असताना गिरवले यांचा मृत्यू झाला होता. तत्पूर्वी गिरवले यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना दोन कर्मचार्‍यांनी मारहाण केल्याचे सीआयडी तपासात निष्पन्न झाले आहे.

from https://ift.tt/3HyjeG8

By News

Leave a Reply

Your email address will not be published.