
पुणे : पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता हिचा विवाह, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दिवंगत चिरंजीव बिंदुमाधव ठाकरे यांचा मुलगा निहार याच्यासोबत होणार आहे. त्यामुळे पाटलांची लेक आता ठाकरेंची सूनबाई बनणार आहेत.
अंकिता पाटील या भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर लागलीच पुण्यातील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये अंकिता पाटील यांनी विजय मिळवत राजकारणात पाऊल टाकलं. जिल्हा परिषदेची निवडणूक त्यांनी विक्रमी मताधिक्क्याने जिंकली होती. हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेले असले तरी अंकिता पाटील अद्याप काँग्रेसमध्येच आहेत.
2014 च्या निवडणुकीतील प्रचार यंत्रणा, सोशल मीडिया या सर्व जबाबदाऱ्या अंकिता पाटील यांच्याकडे होत्या. त्यानंतरच्या काळात खासगी साखर उद्योगाच्या संघटनेतही त्यांना सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
विशेष म्हणजे राजकीय संबंधातून हे लग्न जमलेलं नाही, तर अंकिता आणि निहार हे परदेशात शिक्षण घेत असताना त्यांची ओळख झाली होती, पुढे त्यांच्यात चांगली मैत्री झाली. आता मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाल्यानंतर अंकिता पाटील आणि निहार ठाकरे यांचं शुभमंगल पार पडणार आहे. या लग्नाला दोन्ही बाजूंच्या आप्तेष्टांनी होकार दिला आहे.
दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी कन्या अंकीता हिच्यासह आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या मुंबईतल्या घरी जावून भेट घेतली. सुरुवातीला ही भेट राजकीय असल्याचं वाटत होतं. पण आपण मुलीच्या लग्नाचं आमंत्रण आणि लग्नपत्रिका देण्यासाठी राज ठाकरे यांना भेटायला आलो होतो, असे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले आहे.
from https://ift.tt/31B1Uk7