
पारनेर : पारनेर तालुक्यातील जामगाव परिसरात काल रात्री बिबट्याचे दर्शन झाल्याने या भागात घबराट पसरली आहे. वन खात्याने या परिसराची तातडीने पाहणी करून याठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
काल रात्री उशिरा दोन तरुण दुचाकीवरून भाळवणीवरून जामगावकडे येत असताना महाराजा महादजी शिंदे यांच्या राजवाड्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावर एक बिबट्या त्यांना आडवा गेला. खबरदारीचा उपाय म्हणून या तरुणांनी तातडीने या परिसरातील वाड्या-वस्त्यांवर लोकांना सावध केले तसेच जामगाव मधील सर्व मित्र परिवाराला याठिकाणी बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती मोबाईल वरून देऊन सर्वांना सावध राहण्याची सूचना केली.
या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे समजताच सर्वत्र एकच घबराट पसरली. बिबट्याच्या भीतीने लोक रात्रभर जागे होते.
काही दिवसांपूर्वी याच शिंदे सरकार यांच्या वाड्याच्या आसपास बिबट्याचे दर्शन झाले होते. आता बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. सध्या शेतात विविध प्रकारची शेती कामे चालू असून भीतीने शेतकरी वर्ग शेतात जाण्यास धजावत नाहीत. काही नागरिकांनी या परिसरात दोन बिबट्यांचा वावर असल्याचे सांगितले. तर काहीजणांनी बिबट्याच्या पावलांचे ठसे या ठिकाणी आढळून येत असल्याची माहिती दिली.
याबाबत वन खात्याने तातडीने दखल घेऊन पाहणी करून या परिसरात पिंजरा लावावा ,अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान् सारोळा अडवाई हे गाव जामगाव पासून दोन किलोमीटर अंतरावर आहे.या गावातही बिबट्याचे दर्शन होत असल्याने रात्री पिकांच्या पाणी भरण्यासाठी जाणारी नागरिक धास्तावले आहेत. जामगाव व सारोळा अडवाई परिसरात वनखात्याने पिंजरा लावून बिबटला पकडण्याची मागणी सारोळा अडवाईचे सरपंच परशुराम फंड यांनी केली आहे.
from https://ift.tt/3GD6hKV