
पारनेर: तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील 16 विद्यार्थ्यांना तसेच 3 शिक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली असून यामध्ये पारनेर, संगमनेर, श्रीगोंदा, श्रीरामपूर व नगर येथील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. इयत्ता दहावी व बारावीची अनेक विद्यार्थी परीक्षेसाठी नवोदय विद्यालयामध्ये बाहेर गावाहून आले होते त्यामुळे या विद्यार्थ्यांकडून बाधा झाली असण्याची शक्यता नवोदय विद्यालयाच्या प्रशासन व पारनेर आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.
या नवोदय विद्यालयातील 9 विद्यार्थ्यांना काल (गुरुवारी) कोरोना सदृश्य आजाराची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांची टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यामुळे नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे तपासणीत आढळून आल्याने उर्वरित विद्यार्थ्यांची आज (शुक्रवारी) सकाळी तपासणी केली असता 10 विद्यार्थ्यांना व एका संगीत शास्त्र विषयाच्या शिक्षकालाही गुरुवारी बाधा झाली असल्याचे तपासणी अहवालात आढळून आले आहे. यामुळे विद्यार्थी व शिकाकांसह या 19 जणांना पारनेर ग्रामीण रुग्णालयातील शासकीय कोव्हिड सेंटरमध्ये आरोग्य विभागाने उपचारासाठी दाखल केले आहे.
या घटनेची माहिती समजताच तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, गटविकास अधिकारी किशोर माने यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश लोंढे, डॉ.अन्विता भांगे, या आरोग्य विभागाच्या पथकाने तातडीने 410 जणांचे नमुने घेण्यास सुरुवात केली असून यापैकी 200 जणांचे नमुने तपासून झाले असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील दोन दिवसात 19 कोरोना बाधित आढळून आल्याने विद्यार्थी व पालकांचे तसेच शिक्षकांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तपासणीसाठी व उपचारादाखल करण्यासाठी पालकांनी विद्यालयात एकच गर्दी केली आहे.
या विद्यालयातील विद्यार्थी संख्या 410 च्या आसपास असून या विद्यालयात जवळपास 70 ते 80 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची पण तपासणी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार शिवकुमार आवळकंठे व गटविकास अधिकारी किशोर माने यांनी दिली आहे.
from https://ift.tt/3Eq28bB