आपण ज्याला विचारांची परिपक्वता म्हणतो ती अनेकदा फसवी असते.आर्थिक समृद्धीलाच आपण यशाचं लेबल लावतो.आर्थिक समृद्धी हवीच आहे पण त्याबरोबर सद्विचारांची समृद्धी नसेल तर अनैतिक गोष्टी आपल्या हातुन घडतातच.तसा कंपु आपल्या भोवती आपोआप तयार होणार.तसंच आर्थिक दारिद्र्य असता सद्विचारांचं दारिद्र्य असेल तरीही तेच होणार.
अविचारी,लुटारु वृत्तीचा कंपु आपल्या भोवती तयार होणार.म्हणजेच विचारांचं आंतरीक दर्शनच आपलं प्रदर्शन कसं होणार हे ठरवतात.
आपण सध्या ध्यानसाधनेवर चिंतन करत आहोत.हा त्याचाच एक भाग आहे.मला एक प्रश्न आला आहे, की महाराज पोट भरल्यावरच ध्यान धारणा,वैचारिक प्रगल्भता वगैरे सुचते.पोट भरण्यासाठी हे कामाला येत नाही. मला हा प्रश्नच खूप आवडला आहे. यावरच बोलावं वाटत आहे.
रित्या पोटीच विचारांचं अंकुरण आहे. पोट भरल्यावर तर माणूस पोट भरण्याच्या नव्या पद्धती शोधतो.जगण्यासाठी पत्रावळीवरचं जेवणही चालतं हे तो पर्यंतच मान्य असतं जोपर्यंत तुमच्याकडे ताटांची रेलचेल नसते.रस्त्यावर जेवणाच्या पंगतीत तो पर्यंतच बसण्याची हिम्मत असते,जोपर्यंत तुमच्याकडे डायनिंग टेबल नाही.हातगाडीवरचा वडापाव तोपर्यंत गोड लागेल जोपर्यंत तुमची चांगल्या हॉटेलमध्ये जाण्याची परिस्थिती नसते.या सगळ्यात पोटाची भुकच प्रधान आहे. सगळं मिळवण्याच्या नादात भुकच गायब होण्याची शक्यता मोठी असते.म्हणजे आपण असं नेहमी म्हणतो की गरीब पोट भरण्यासाठी पळत असतो तर श्रीमंत पोटातलं पचवण्यासाठी.
प्राप्त परिस्थितीत आनंदाने जगणं हेच लाभकारक आहे. त्यासाठीच सद्विचारांनी ताट भरलेलं असलं पाहिजे.जगण्याची खटपट करण्यासाठी नुसती शारीरिक ऊर्जा कामाला येत नाही!त्याबरोबर बौद्धिक क्षमताही महत्त्वाची आहे. मन प्रसन्न असणं महत्वाचं नाही का?कोणत्याही वर्गातली व्यक्ती मग ती गरीब असो की श्रीमंत,सुशिक्षित असो की आडाणी,अस्तिक असो की नास्तिक तो आत्महत्येपर्यंत का जाते?त्यामागचं एकच कारण “वैचारिक अनुसंधान”कमी पडले.ध्यान साधनेतुन आम्हाला हेच अपेक्षित आहे. वैचारिक अनुसंधान आनंदी जगण्याचा मुख्याधार आहे.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/DFNQM2Y

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *