पारनेर : शहरात नगरपंचायतीची रणधुमाळी सुरू आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. परंतु अद्यापही पक्षापक्षात ताळमेळ दिसत नाही. उमेदवारी अर्ज माघारीनंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट झाल्यावरच खरी रंगत येणार आहे. या पार्श्वभूमीवर ‘पारनेर दर्शन चे संपादक, वात्रटिकाकार देविदास आबूज यांच्या खास शैलीतून उद्यापासून (सोमवार) ‘दे धक्का’ हे खास सदर पारनेर दर्शन न्यूज पोर्टलच्या माध्यमातून वाचकांच्या भेटीला येत आहे.
श्री.आबूज यांनी आत्तापर्यंत विविध नामांकित दैनिकात दे धक्का,फोडणी अशा शीर्षकाखाली जिल्हा परिषद, पंचायत समिती, शिक्षक बँक, नगरपंचायत अशा निवडणुकांत वात्रटिका लिखाण केलेले आहे. शीघ्र कविता, चारोळ्या, वात्रटिका असा त्यांचा व्यासंग आहे.
पारनेर नगरपंचायतीची रणधुमाळी सुरुवात झाली आहे. राज्यात महाविकास आघाडी असली तरी पारनेर नगरपंचायतीत शिवसेना-राष्ट्रवादी बिघाडीच आहे. भाजपाने स्वबळाचा नारा दिला असला तरी पडद्याआडून सेना, भाजपा शहर विकास आघाडीची चर्चा अद्यापही सुरूच आहे. काँग्रेसने मेळावा घेऊन निवडणूक लढविण्याची वल्गना केली असली तरी शहरात त्यांची ताकद अगदी क्षीण आहे या सर्व पार्श्‍वभूमीवर ‘दे धक्का’ हे सदर सुरू करण्यात येणार आहे.
केवळ मतदारांचे निखळ मनोरंजन करण्याचा ‘दे धक्का’चा हेतू आहे. निवडणूक काळात घडणारे रंजक किस्से, घटना काही सत्य तर काही काल्पनिक घडामोडींवर आधारित हे सदर नगरपंचायत निवडणुकीपर्यंत वाचकांच्या सेवेसाठी सुरू राहणार आहे. निवडणूक काळात पारनेर शहरवासियांबरोबरच तालुकावासियांचे हलकेफुलके मनोरंजन करण्याच्या हेतूने सदर सुरू राहणार असून यात कोणत्याही राजकीय पक्षाचे, नेत्यांचे, उमेदवार व कार्यकर्त्यांच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नसल्याचे देविदास आबूज यांनी सांगितले.

from https://ift.tt/3xUpLHw

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *