पारनेर तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी !

Table of Contents

पारनेर : ग्रामसेवक व सरपंचाच्या संगनमताने वडगाव सावताळ ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन ग्रामपंचायत सदस्य संजय रोकडे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले. तर ग्रामपंचायतीच्या खात्यामधून परस्पर काढण्यात आलेल्या रकमा व तक्रारीनंतर खात्यात जमा झालेल्या रकमेचे पुरावे देखील सादर तक्रारदार ग्रामपंचायत सदस्याने सादर केले.
ग्रामपंचायतमध्ये होणारी कामे व तपशील दाखविण्याची मागणी केली असता सदर माहिती दाखविण्यास टाळाटाळ करण्यात आली. सरपंच यांच्या दबावाखाली सदर माहिती दडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी अधिक माहिती घेतली असता ग्रामपंचायतच्या बँक खात्यातून वैयक्तिक नावाने मोठ्या रकमा स्वार्थासाठी काढण्यात आल्या आहेत.
या प्रकरणी 8 नोव्हेंबर रोजी गटविकास अधिकारी, पंचायत समिती नगर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर ग्रामसेवक आणि सरपंच यांनी ग्रामपंचायतच्या खात्यात अपहार केलेल्या रकमा रोख स्वरुपात भरल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य संजय रोकडे यांनी केला आहे.
सदर प्रकरणी गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करण्यास गेले असता त्यांच्याकडून देखील उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. या प्रकरणात ग्रामसेवक व सरपंच यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. ग्रामसेवक व सरपंच हे दोघे संगनमताने वैयक्तिक फायद्यासाठी गावाच्या निधीचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सदर प्रकरणी वडगाव सावताळ ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

from https://ift.tt/3x4jbOj

Leave a Comment

error: Content is protected !!