
पारनेर : मागील तीन -चार दिवस संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसाने व गोठवणार्या थंडीने बळीराजा प्रमाणेच मेंढपाळ बांधवांचे ही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. फक्त पारनेर तालुक्याचाच विचार केला तर जवळपास सहाशे ते सातशे शेळ्या-मेंढ्या या दोन दिवसात पाऊस व कडाक्याच्या थंडीमुळे मृत्युमुखी पडल्या आहेत.
या काळात तालुक्यातील मेंढपाळांना आधार देण्यासाठी तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी मेंढपाळांच्या वाड्यावर जाऊन त्यांच्या गाठीभेटी घेतल्या, त्याच वेळी त्यांनी मेंढपाळ बांधवांना मदत करण्याचे आवाहन तालुका केले होते. त्याप्रमाणे पारनेर येथील आ. निलेश लंके यांचे समर्थक अजिम शेख व पाकीजा शेख यांनी बाजार समितीच्या लगत बांधकाम सुरू असलेल्या त्यांच्या नवीन घरामध्ये मेंढ्यांना मुसळधार पावसामध्ये बसण्यासाठी आश्रय दिला.
शुक्रवारी ढवळपुरी येथील मेंढपाळ भीमा कोळेकर मेंढ्यांना चारण्यासाठी बाजार समिती परिसरात थांबलेले होते. संध्याकाळी पारनेरमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाल्याने या मेंढपाळाच्या तोंडचे पाणीच पळाले. त्याने आपल्या मेंढ्या शेख कुटुंबियांच्या घराच्या आसऱ्याला आल्यानंतर शेख कुटुंबीयांनी ते पाहिल्यानंतर आपल्या बांधकाम चालू असलेल्या नवीन घरात मेंढ्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. अतिशय जोरदार पाऊस सुरू झाल्याने मेंढ्यांच्या जिवाला धोका होऊ शकतो याचा विचार करून सर्व पाच खंडी म्हणजेच जवळपास शंभर मेंढ्या बसण्यासाठी जागा उपलब्ध झाल्याने त्यांना खूप मोठा आधार मिळाला.
अजीम शेख व कुटुंबियांनी मेंढपाळ बांधवांना आपल्या नवीन घराचे बांधकाम चालू असताना निवारा दिल्याने मेंढपाळ कोळेकर यांनी त्यांचे आभार मानले असता, तुम्हाला अजून काही दिवस थांबायचे असेल तर थांबा तसेच पाणी व इतर काही जरी लागले तर घ्या असे त्यांनी सांगितले. आपल्या मेंढ्यांना जिवापाड प्रेम करणारे व जपणारे भिमा कोळेकर व त्यांचे कुटुंबीय या मदतीमुळे भारावून गेले आहेत.
from https://ift.tt/2ZW1pAF