
पारनेर : पारनेर तालुक्यातील जनता कालपासून महाबळेश्वरच्या फिलचा अनुभव घेत आहे. बोचऱ्या थंडीने दोन दिवसांपासून तालुका गारठून गेला असून काल दिवसभरात एकदाही सूर्यदर्शन झाले नाही. तर अनेक ठिकाणी भर दुपारी शेकोट्या पेटल्याचे चित्र पहावयास मिळाले. काहींनी काम असूनही थंडीमुळे घराबाहेर पडणे टाळले. पारनेरचे कालचा पारा 15 अंशाच्या खाली घसरला होता.
यंदा पाऊस जास्त झाल्याने डिसेंबरच्या शेवटी थंडीची लाट आणि पावसाची येण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त केली होती. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काल परवा गारांच्या पावसाचा तडाखाही बसला. परंतू दुसरीकडे नगर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात बोचरी थंडी मात्र नागरिकांना नकोशी झाली आहे. पारनेर तालुक्यातील जनता तर
यंदा घरबसल्या माथेरान आणि महाबळेश्वरचा फिल अनुभवत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून कधीच असा अनुभव तालुक्यातील जनतेने घेतला नव्हता.
थंडीचा हा माहोल आणखी आठ दिवस असाच राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पारनेरसह जिल्ह्यात अशीच स्थिती आहे. या थंडीचा फटका माणसांसह पाळीव जनावरांना ही बसला आहे. याच महिन्यात तालुक्यात थंडीने गारठून अनेक मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या होत्या त्यामुळे या मेंढपाळांचे मोठे नुकसान झाले होते तो अनुभव लक्षात घेऊन या थंडीत मेंढपाळ मेंढ्यांची सर्वतोपरी काळजी घेत असल्याचे चित्र कालपासून तालुक्यातील ढवळपुरीसह अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे.
नगर बरोबरच पुण्याचा पारा देखील ७ अंशाखाली तर नागपूरचा पारा ५ अंशाखाली तर नाशिक जिल्ह्यामधील निफाडचे तापमान शून्य अंश सेल्सिअस गाठू शकेल. विदर्भ, मराठवाडा, उत्तर व पश्चिम महाराष्ट्र आणि त्यानंतर कोकण किनारपट्टी असा तापमान घसरण्याचा दर असेल. चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली येथे तापमानात सर्वात जास्त खाली येईल, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
from https://ift.tt/3mLEL6i