
चुकतो तो साधारण मनुष्य,चुका सुधारतो तो खास मनुष्य आणि चुका होणारच नाहीत याची काळजी घेतो तो देवमाणूस. चुका झाल्याच नाहीत असा मनुष्य या भुतलावर उपलब्ध नाही.वयाच्या विशीपर्यंत अज्ञानाने अनेक चुका होतात,विस ते तिशीपर्यंत सदविवेक प्राप्त करता आला नाही तर तारुण्याच्या उफाड्याने अनेक आत्याचारीत कर्मं घडतात.
हे पापाचरण आहे याचा बोध झाला नाही तर विशुद्ध कर्मगती वाढते. मात्र आयुष्य असलं तर पन्नाशी पर्यंत उपरती शक्य आहे.कारण आपण किती खोल खड्डा खणला आहे याचा ज्याला त्याला अंदाज असतोच.तो बुजवल्याखेरीज उत्तर आयुष्यात मुक्ती अनुभव केवळ अशक्य. म्हणून हातपाय चांगले काम करतात तो पर्यंतच उपरती होण्याचा उपयोग आहे. त्या पुढील वयातही शुद्वाचरण आनंद देईल पण मुक्ती नाही. परतफेड केल्याचा आनंद नाही.
तुकोबाराय म्हणतात, वाल्हा विश्वामित्र वशिष्ठ,नारद।यांचे पुर्व शुद्ध काय आहे।।
न व्हावे ती जालीं कर्मे नरनारी।अनुतापे हरी स्मरता मुक्त।।
आपण वाल्मिक ऋषी,विश्वामित्र, वशिष्ठ, नारद यांचे पूर्वायुष्य दोषयुक्त होते हे जाणतो,जी पापकर्मज घडु नयेत ती घडली,पण तरीही ते पुजनीय झाले ते कसे? अनुताप हा त्याचा मुख्य मार्ग आहे. पश्चाताप झाला तरच सुधारणा शक्य आहे.पापाचरण कसं घडतं?हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही.
आपण हे चुकीचे करतोय हे जीवाला सांगणारा आंतरात्मा कुठे दुर नाही. तो जाणीव करुन देतोच.पण मोह,मद,लालसा,अहंकार त्याचं काही चालू देत नाहीत.म्हणुनच तुकोबाराय म्हणतात,अनुतापे हरी स्मरता मुक्त. ही जाणीव निर्माण करण्याचं काम भगवंताचा गुणानुवाद करतो.त्यासाठी हरी हरी करायचं आहे. स्वतःचं प्रदर्शन थांबवण्यासाठी देवदर्शन आहे. देवदर्शनाचं प्रदर्शन होणार नाही याची खूप काळजी घ्यायला हवी.अन्यथा अनुतापातुन नवीन ताप जन्माला येतो.मग सुटका नाही. नामस्मरण हा राजमार्ग आहे. त्यावर नम्र होऊन चालायचे आहे.त्याने सांप्रत जीवनातच मुक्तानंद अनुभवता येईल.
रामकृष्णहरी
from Parner Darshan https://ift.tt/3o0018e