दापोली : दापोली मतदारसंघाचे २५ वर्षे आमदार राहिलेले शिवसेना नेते सूर्यकांत दळवी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. त्यांचे कट्टर समर्थक दापोली पंचायत समितीचे माजी सभापती किशोर देसाई, शांताराम पवार, नगराध्यक्ष परवीन शेख, प्रदेश युवा सेना पदाधिकारी ऋषिकेश गुजर आदींसह अनेक शिवसेना नेते उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या प्रवेशामुळे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचा पक्षप्रवेश म्हणजे औपचारिकताच असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.
मुळात सलग पाच वेळा विधानसभा निवडणूक जिंकणाऱ्या सूर्यकांत दळवी यांनीच खऱ्या अर्थाने दापोली व मंडणगड तालुक्यात शिवसेना रूजवली. पण कुणबी अस्मितेच्या मुद्दय़ावर मतविभाजन होऊन २०१४ मध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. आणि तेव्हा राज्याचे तात्कालिन पर्यावरण मंत्री आणि खेडचे सुपूत्र रामदास कदम यांनी आक्रमकपणे या शिवसेनेच्या बालेकिल्लय़ाची सूत्रे आपल्या ताब्यात घेण्यास सुरूवात केली. २०१४ ते २०१९ या पाच वर्षांत दळवी विरोधकांच्या साह्यने दापोली मंडणगडात कदम यांनी आपले वर्चस्व निर्माण करत दळवींना पक्षाच्या निर्णयप्रक्रियेतून बाजूला केले. तसेच विधानसभेसाठी आपले चिरंजीव योगेश कदम यांना उमेदवारी मिळवून देत दापोली मतदारसंघात २०१९ मध्ये निवडूनही आणले. या निवडणुकीपूर्वी नाराज सूर्यकांत दळवी भाजपमध्ये जाणार की राष्ट्रवादीत, या चर्चांना उधाण आले होत. तशा कार्यक्रमांतही त्यांची उपस्थिती दिसू लागली होती. पक्षात राहून कुरघोडय़ा करण्याचा हा दळवी पॅटर्न रामदास कदम समर्थकांना सलणारा ठरत होता. तेदेखील दळवी कधी एकदा पक्ष सोडून जातील, याकडे लक्ष ठेवून होते. त्यावरून रामदास कदम हेदेखील त्यांना खोचकपणे लवकरात लवकर पक्षांतर करण्याचे जाहीर आवाहन करत होते. पण २०१९ ची निवडणूक होऊनही दळवी आणि त्यांचे कट्टर समर्थक शांतच राहिले. या काळात शिवसेना पक्षश्रेष्ठींनीही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.
दरम्यान, एकेकाळचे त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आणि शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले दापोली पंचायत समितीचे माजी सभापती किशोर देसाई हेदेखील राष्ट्रवादीकडून उमेदवारी नाकारल्याने २०१४ पासून पुन्हा शिवसेनेत आले आणि तेव्हापासून दळवींसोबतच राहिले.
दुसऱ्या बाजूला ‘सामदामदंडभेद’ नीतीमध्ये वाकबगार असलेल्या रामदास कदम यांनी एकेक करत बहुसंख्य दळवी समर्थकांना स्वत:च्या झेंडय़ाखाली आणले, तरी माजी सभापती राहिलेल्या देसाई आणि शांताराम पवार यांच्यासह ऋषिकेश गुजर आदी निवडक नेत्यांनी मात्र दळवींची साथ सोडली नाही. फक्त दाभोळचे हेवीवेट नेते शिवसेम्ना नेते उद जावकर आणि माजी साभापती स्मिता जावकर यांनी रामदास कदम यांचे वर्चस्व झुगारून भाजपचा झेंडा हाती घेतला. मात्र दळवी यांच्या पराभवानंतर तब्बल सात वर्षे थांबलेल्या त्यांच्या सच्च्या सरदारांनी नगरपंचायत निवडणूक तोंडावर आलेली असताना राष्ट्रवादीत जाण्याचे जाहीर करून आपली रणनीती स्पष्ट केली आहे?. ते राष्ट्रवादीत गेल्यानंतर दळवींचे पक्षांतर ही फक्त औपचारिकताच उरणार आहे.
दरम्यान, पक्षांतराचा हा कार्यक्रम मुंबईतील राष्ट्रवादी भवनात होणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असले तरी पक्षाचा वरिष्ठ नेता दिल्लीत असल्याने हा कार्यक्रम ते आल्यानंतर २ डिसेंबरला होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दीग्गजांचे पक्षांतर शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांच्यासाठी भविष्यात आव्हानाचे ठरणार आहे. तसेच अशा दीग्गजांच्या आगमानाने मतदारसंघावर आपले वर्चस्व कायम ठेवणे राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनाही तारेवरची कसरत ठरणार आहे?. सूर्यकांत दळवी आणि किशोर देसाई यांना पराभूत करूनच संजय कदम यांना आमदारकीचा मान मिळाला होता?. आता त्यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांचे अस्तित्व कसे टिकून राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र या पक्षांतराने सुनील तटकरे यांची दापोलीतील ताकद वाढण्यास मदत होणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

from https://ift.tt/3D7bTKZ

By News

Leave a Reply

Your email address will not be published.