
मुंबई : कोरोनाचा नवा प्रकार असलेल्या ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने होत आहे. आतापर्यंत देशातील 12 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे 143 रूग्ण आढळून आले आहेत. त्यातच आता राष्ट्रीय कोविड-19 सुपरमॉडेल समितीने कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली आहे. समितीच्या मते, कोरोनाची तिसरी लाट फेब्रुवारी 2022 पर्यंत येऊ शकते.
राष्ट्रीय कोविड-19 सुपरमॉडेल समितीने दिलेल्या माहितीनुसार, 2022 च्या फेब्रुवारीमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. ही लाट ओमायक्रॉनमुळेच येईल. परंतु, दिलासादायक बाब म्हणजे ही तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षा कमी धोकादायक असेल.
याबाबत माहिती देताना राष्ट्रीय कोविड-19 सुपरमॉडेल समितीचे प्रमुख विद्यासागर म्हणाले, “सध्या भारतात कोरोनाचे रोजचे 7 हजार 500 च्या आसपास रूग्ण आहेत. परंतु ओमायक्रॉनने डेल्टा या मुख्य विषाणूचे स्वरूप धारण केले तर, कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढेल. ओमायक्रॉन हा डेल्टापेक्षा जास्त वेगाने पसरतो.”
सेरो सर्वेक्षणाच्या आधारे विद्यासागर म्हणाले की, “आपल्या देशात अद्याप बऱ्याच लोकांना डेल्टाचा फटका बसला नाही. अशा परिस्थितीत येणारी तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षा जास्त धोकादायक ठरणार नाही. याशिवाय, यावेळी देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. देशानेही आपली क्षमता वाढवली आहे. हे पाहता आपला देश या येणाऱ्या आव्हानाला तोंड देऊ शकेल.”
विद्यासागर म्हणाले की, “कोरोनाची तिसरी लाट आली तर देशात दररोज किमान 2 लाख कोरोनाचे रूग्ण आढळून येण्याची शक्यता आहे.” मात्र, हा केवळ अंदाज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संख्या यापेक्षा जास्त किंवा कमी असू शकते.
from https://ift.tt/3mgNVrf