
आपण देव देव करत असाल तर त्यामागे न मागण्याचा भाव असेलच कसा? काही तरी हवं आहे.शिवाय असं हवं आहे की जे आपल्या हातात नाही. जे मिळवायचं आहे,त्यासाठी लागणारं बळ मनुष्याच्या हातात असलं तरी ते मिळवणं अशक्य असतं.
माणसांची मतं जुळत नाहीत त्यामुळे इच्छित कार्यात बाधा येते.ही बाधा सारणं शक्य होत नाही त्यामुळे दुःखाचा सामना करावा लागतो.सर्व काही जमुनही अपयश येत राहिले की मग मन दुःखी होते.आपल्या सगळ्या मागण्या या प्रापंचिक असणार यात नवल नाही. इथलं जगणं समृद्ध व्हायला हवं हा अट्टाहास असायलाच हवा.पण मलाच मिळालं पाहिजे हा आग्रह संकटांचा धनी आहे.तो आग्रह सोडता आला तर देव कशासाठी, याचा बोध होतो.देवासाठी देवाला मागणारा विरळाच.
तुकोबाराय म्हणतात,
नाही तुज काही मागत संपत्ती।आठवण चित्ती असो द्यावी।।
सरलिया भोग येईल शेवटी। पाया पे या भेटी अनुसंधाने।।
देवा तुझ्याकडे मी काही धनसंपत्ती मागत नाही,श्रीमंती मागत नाही. वासना शिल्लक राहिल्यानेच पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतोय.मनुष्य देहात ते भोग भोगावेच लागतात.भोग भोगुनच संपवावे लागतात.ते मी भोगुन संपवणार आहे पण देवा शेवटचा क्षण आठवणीत असु द्या.हा देह टाकल्यानंतर तुमच्या चरणाजवळ जागा द्या.त्यासाठीच हे भक्तीचं अनुसंधान आहे.
त्यासाठीच तुझी याचना करीत आहे.
तुकोबारायांनी देवाशी अनुसंधान सांगितले आहे. अनु म्हणजे अतिसूक्ष्म.सुईच्या अग्रावर बसेल त्याहुनही सुक्ष्म.संधान म्हणजे संबंध. डोळ्यांना न दिसणारं नातं जोडायचं आहे. ते नामानेच साधता येईल.
आपण देव यासाठी प्राप्त करायचा आहे. शेवटचा दिस गोड व्हावा।तुकोबारायांचा अट्टाहास यासाठी आहे. आपला विचार,भक्ती अनुसंधानात बसल्याशिवाय देवाची ओळख होत नाही.
रामकृष्णहरी
from https://ift.tt/3e4ENkU