✒ सतीश डोंगरे
शिरूर : संत साहित्याचे गाढे अभ्यासक व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या साहित्य प्रवासाला नुकतीच पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने त्यांच्या 50 व्या पुस्तकाचे प्रकाशनही नुकतेच थाटात पार पडले ‘तुमच्या पुस्तक प्रवासाची शंभरी व्हावी’ अशा शब्दांत त्यांचे मूळ गाव असलेल्या कारेगावकर ग्रामस्थांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची गेल्या वेळी हुकलेली संधी भरून निघावी आणि आगामी उदगीर येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान कारेगावच्या मातीला मिळावा, अशी अपेक्षाही यावेळी कारेगाव ग्रामस्थांनी व्यक्त केली.
गावकऱ्यांनी केलेल्या सत्काराने डॉ. देखणे भारावून गेले. कुठल्याही सत्कारापेक्षा गावच्या ग्रामस्थांनी केलेला सत्कार हा मला कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठा वाटतो, अशा भावना डॉ. देखणे यांनी यावेळी व्यक्त केल्या.

आपल्या साहित्य प्रवासाची सुरुवात ही कारेगाव येथून झाली अशी आठवण सांगून डाॅ. देखणे म्हणाले, “1972 चा दुष्काळ पडला त्यावेळी मी कारेगाव येथून पुण्यात आलो. घरून रोज जेवणाचा डबा यायचा. चिठ्ठीद्वारे वडील दुष्काळाची माहिती कळवायचे. जनावरांना मरताना पहावत नाही या वडिलांच्या शब्दाने मी व्याकूळ झालो. गावी आलो जनावरांची आबाळ नको म्हणून मी ती संगोपनास दिली पण रात्रीतून गाय अकरा किलोमीटर प्रवास करून पुन्हा दारात आली मी तुम्हाला जड झाले का? हे डोळ्यातील भाव मला भिडले या अस्वस्थतेतून पहिली कथा लिहिली.

त्यानंतर आज पन्नासाव्या पुस्तकापर्यंत पोहोचलो पुढे हि हा साहित्यिक प्रवास असाच अखंडित चालू राहील, असे डॉ देखणे यांनी सांगितले.
डॉ. देखणे यांची कारेगावच्या मातीशी नाळ घट्ट जुळलेली आहे. महाशिवरात्रीला दरवर्षी कारेश्वर देवाचा अभिषेक व डॉ. देखणे यांचे कीर्तन अशीअनेक वर्षांची परंपरा आजही अखंडितपणे चालू आहे. या शिवाय दरवर्षी गाव जत्रेत हनुमान देवाच्या उत्सवाच्या मनोरंजनाचा म्हणजेच तमाशाचा नारळही डॉ. देखणे यांच्या हस्तेच फोडला जातो. या वेळी होणारे डॉ देखणे यांचे छोटेखानी भाषण म्हणजे गावकऱ्यांसाठी मेजवानीच असते.

from https://ift.tt/3FgBNOz

By News

Leave a Reply

Your email address will not be published.