
सतीश डोंगरे
शिरूर : महाराष्ट्र शासनाच्या सर्वोच्च जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ साहित्यिक, लोकगीतकार, चित्रपट गीतकार, लेखक व कवी बी.के. मोमीन कवठेकर ( वय 79 ) यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.महाराष्ट्राचे ज्येष्ठ कलावंत, साहित्यिक, बी.के.मोमीन यांनी अखंड आयुष्य लोक कलेसाठी खर्च केले. त्यांची लेखणी तमाशा कलावंतासाठी संजीवनी ठरली आहे.
तमाशासाठी अनेक ऐतिहासिक वगनाट्यं, गवळणी, लावण्या, भक्तिगीतं, भारुडं, लोकगीतं लिहून मराठी लोकसाहित्याचा वारसा गेल्या ५० वर्षांपासून समृद्ध करणा-या बी. के. मोमीन यांचा जन्म १ मार्च १९४७ रोजी पुणे जिल्ह्यातील कवठे येमाई येथे झाला. घरातली परिस्थिती हलाखीची. वडीलांचा व्यवसाय खेड्यापाड्यातल्या आठवडी बाजारात कपडे आणि कोंबड्या विकण्याचा.
घरात लोकसाहित्याची कुठलीच परंपरा नाही. पण मोमीन यांना मात्र लहानपणापासूनच कवितेने वेडं केलं. हे वेड त्यांनी आयुष्यभर जपलं. या वेडानेच त्यांना लोकशाहीर हा बहुमान मिळाला होता.
मोमीन यांच्या लहानपणी यमाईचं कवठे हे अत्यंत मागास भागातलं गाव होतं. गावात शाळा नाही. प्रवासाला एसटी नाही. त्यामुळे दररोज कवठे ते लोणी असा सायकलने प्रवास करायचा. परंतु घरातली आर्थिक परिस्थिती शिक्षणात लक्ष लागावं अशी नव्हतीच. त्यामुळे नववीनंतर शाळेला रामराम ठोकून वडीलांचा व्यवसायात लक्ष घालावं लागलं.
मलठण, शिरुर, तळेगाव ढमढेरे , कान्हूर अशा आठवडी बाजारात कोंबड्या, कपडे विकायचे. ते करतानाच आपला लोककलेचा छंद जपणं, हे आर्थिक अडचणीच्या काळात सोपं नव्हतं. पण मोमीन यांनी शाळेत असल्यापासूनच लोकगीतं ऐकून, पाहून लोकसाहित्याचे धडे घेतले. अकरा वर्षाचे असताना त्यांनी ग्रामदैवत यमाईवर स्वतः एक गाणं रचून गायलं. त्याचं बक्षीस म्हणून त्यांना शाळेत कार्यक्रम बघायला आलेल्या लोकांनी दहा पैसे, पाच पैसे देऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
या घटनेने त्यांची लिखाणाची उमेद वाढली. मग त्यांनी ठरवून टाकलं की आता मागे वळायचं नाही. त्यानंतर जागरण-गोंधळ असो की भजनाचे कार्यक्रम, गाणं रचून देण्यासाठी त्यांच्या घरासमोर रांगा लागू लागल्या. खेड्यापाड्यात मोमीन यांनी तयार केलेली गाणी जागरण गोंधळात आणि भारुडात वाजू लागली.
बी. के. मोमीन हे तमाशासाठी पहिलं गाणं लिहिल्याची आठवण सांगताना म्हणायचेमी साधारण सोळा सतरा वर्षाचा असताना गावात तुकाराम खेडकर सह विठ्ठल कवठेकर यांचा पहिला तमाशा आला. तेव्हा त्यांनी अनेक लोकगीतं माझ्याकडून लिहून घेतली व सादर केली. विठ्ठल कवठेकर हे गंगाराम कवठेकर यांचे चुलत बंधू. त्या काळात विठ्ठलदादांनी मला खूपच उमेद दिली.
त्यापुढचा टप्पा मोमीन यांच्या शब्दांत असा, `पंचक्रोशीत माझ्या लोकगीतांचा बोलबाला सुरू झाला, गाजलेल्या गाण्यांच्या तालावर त्या वेळची तरुणाई नाचायची. एक दिवस संगीतरत्न दत्ता महाडिक-पुणेकर यांच्या हाती माझं एक लोकगीत लागलं. हे लोकगीतं कोणी लिहिलं अशी माहिती त्यांनी काढली. तेव्हा त्यांना कळले की, कवठ्याचा एका पोरानं हे गीत लिहिले आहे. दत्ता महाडिकांनी मला बोलवून घेतले. यापुढे माझ्या तमाशातली गाणी तूच लिहायची, असं मला फर्मानं सोडलं. तेव्हापासून त्यांच्या तमाशासाठी मी अनेक लोकगीतं, लावण्या, गवळणी लिहिल्या.
`कोणी कुणाला नाही बोलायचं, हे असंच चालायचं`, `सारं हायब्रीड झालं`, `खरं नाही काही हल्लीच्या जगात`, फॅशनचं फॅड लागलंय गॅड`, अशी त्यांची अनेक लोकगीतं दत्ता महाडिक यांनी स्वतः गायली.
मुस्लिम लोककलाकाराची शिवकालावर नाटकं गाण्याइतकंच मोमीन यांना घडलेल्या सत्यकथा आणि ऐतिहासिक कथांवर लेखन करायला खूप आवडायचं. म्हणूनच आपल्या काव्यसंग्रहाबरोबर त्यांनी वगनाट्यं आणि नाटकं लिहिण्याचा छंद जोपासला.
एक मुस्लिम समाजातला लोककलावंत छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज यांच्या जीवनावर ऐतिहासिक नाटकं लिहितो, हे अनेकांच्या पचनी पडत नाही. पण प्रत्येक शिवप्रेमीचं ऊर भरून यावं असं जबरदस्त लिखाण त्यांनी केले होते.
from Parner Darshan https://ift.tt/3Hiz8oI