
पारनेर : मागील ४-५ दिवसांपासून अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्राच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. तसेच सकाळपासून उन्हाची साधी तिरीप सुद्धा पडत नसून सतत ढगाळ वातावरण आणि दाट धुके देखील पडत आहे. हे वातावरण पिकांच्या वाढीसाठी प्रतिकूल असून अनेक प्रकारच्या कीड व रोगांचा प्रादुर्भाव होण्यास कारणीभूत ठरते. पुढील किमान २-३ दिवस अशीच स्थिती राहणार असल्याने अशा वातावरणाचा मोठा फटका कांदा, गहू, हरभरा, यांसारख्या रब्बी हंगामातील प्रमुख पिकांसह द्राक्ष, डाळिंब इ. फळ पिकांनाही बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पादनात लक्षणीय घट येऊन मोठे नुकसान होऊ शकते.
पारनेर तालुक्याचा विचार करता कांदा हे प्रमुख नगदी पीक आहे. तालुक्याच्या बहुतेक भागात खरीप, रांगडा आणि मुख्यतः रब्बी हंगामातील कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. तालुक्यातील कांदा पिकालाही सध्याच्या अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसला असून करपा या बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे पाती शेंड्याकडून खालच्या दिशेने पिवळ्या पडत आहेत. हळू हळू हे पिवळे चट्टे तांबूस तपकिरी रंगाचे होऊन पाती वाळत आहेत. संपूर्ण शेते च्या शेते सध्या करपा ग्रस्त झालेली पहावयास मिळत आहेत. त्याचबरोबर थ्रीप्स ( फुलकिडे ) या कांद्यावरील प्रमुख रसशोषक किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ही कीड पोंग्यामध्ये लपून राहते व कोवळ्या पातीचा पृष्ठभाग खरवडून त्यातून बाहेर येणार रस शोषून घेते. त्यामुळं पातीवर सुरुवातीला पांढरट चट्टे दिसून येतात जे कालांतराने तांबूस तपकिरी रंगाचे होतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण पीक पिवळसर तपकिरी रंगाचे दिसू लागते. फुलकिडे या किडीचा जास्त प्रादुर्भाव हा करपा रोगाच्या प्रादुर्भावासही कारणीभूत ठरतो.
करपा रोग आणि फुलकिडे यांच्या प्रादुर्भवामुळे कांद्याच्या पातीतील हरित द्रव्याचे प्रमाण कमी होते व त्यामुळं प्रकाश संश्र्लेषण ही अन्न तयार करण्याची क्रिया मंदावते त्याचा विपरीत परिणाम कांदा पोसण्यावर होतो व पर्यायाने उत्पादन घटते. त्यामुळे अवकाळी पाऊस आणि धुकट वातावरणात आपल्या कांदा पिकाची काळजी घेणे गरजेचे आहे.
करपा रोगाच्या नियंत्रणासाठी
१. टेब्युकोनॅझोल बुरशीनाशकाची १ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी
२. रोगाचा प्रादुर्भाव कमी होत नसेल आणि ढगाळ वातावरण तसेच कायम असेल तर ८ ते १० दिवसाचे अंतराने अझोक्झीस्टोबीन या बुरशीनाशकाची १ मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून आणखी एक फवारणी करावी
३. फवारणी करताना बुरशीनाशक सोबत स्टीकर १ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळावे.
फुलकिडे नियंत्रणासाठी
१. फिप्रोनील 5%SC १ मिली प्रति लिटर पाणी
किंवा
२. थायोमिथोक्झाम 25 WG अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाणी
याप्रमाणे कोणत्याही एका कीटक नाशक औषधाची फवारणी करावी.
फवारताना घ्यावयाची काळजी:
१. एकाच वेळी एकापेक्षा अधिक कीटकनाशकांचे मिश्रण करून फवारू नये.
२. त्वचेला इजा होऊ नये म्हणून कीटकनाशके उघड्या हातांनी हाताळू नयेत, हातामोज्यांचा वापर करावा
३. श्वासाद्वारे शरीरात जाऊन विषबाध होऊ नये यासाठी फवारणी करताना नाक आणि तोंडाला मास्क लावावा
४. फवारणीचे तुषार/शिंतोडे डोळ्यात गेल्यास गंभीर इजा होऊन दृष्टी जाऊ शकते, त्यामुळे डोळ्यांना गॉगल किंवा संरक्षक हूड लावावे .
५. रिमझिम पाऊस पडत असताना फवारणी करू नये. पावसाच्या पाण्यासोबत फवारलेले औषध धुवून जाते व त्याचा अपेक्षित परिणाम मिळत नाही.
from https://ift.tt/3Eq1QCd