✒ सतीश डोंगरे
शिरूर : शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे बैलगाडा शर्यतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. आढळराव पाटील यांनी आंबेगावमध्ये तर डॉ.अमोल कोल्हे आणि मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी मावळमध्ये दि. 11 व दि.12 फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. आढळराव पाटील यांच्या समर्थकांनी ‘पहिली बैलगाडा शर्यत आंबेगावमध्ये’ तर डॉ. कोल्हे यांच्या समर्थकांनी ‘पहिली बैलगाडा शर्यत मावळमध्ये ‘अशा आशयाचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.
आंबेगाव व मावळ या दोन्ही ठिकाणी 11 दिनांक 12 रोजी या शर्यती होणार आहेत. या शर्यतींसाठी मोठ्या प्रमाणात बक्षिसांची रेलचेल आहे. आंबेगाव तालुक्यातील बैलगाडा शर्यती लांडेवाडी-कोळवाडी येथील घाटात होणार आहेत. त्यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. या ठिकाणी प्रथम क्रमांकासाठी एक लाख रुपये क्रमांकासाठी 75 हजार रुपये तर तृतीय क्रमांकासाठी 55 हजार रुपये चौथ्या क्रमांकासाठी 41 हजार रुपये तर पाचव्या क्रमांकासाठी 31 हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. याशिवाय फ्रीज, एलइडी, सोन्याची अंगठी, मोटारसायकल अशी भरघोस बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. ‘घाटाचा राजा’ आणि ‘फायनल सम्राट’ यासाठी स्वतंत्र बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
मावळ मधील बैलगाडा शर्यती नाणोली घाटात होणार आहेत. या ठिकाणी प्रथम क्रमांकासाठी एक लाख 51 हजार रुपये , द्वितीय क्रमांकासाठी 1लाख रूपये, तृतीय क्रमांकासाठी 75000 रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे. या शिवाय प्रथम क्रमांकात येणाऱ्या प्रत्येक बारीस मोटरसायकल भेट देण्यात येणार आहे. तर घाटाचा राजा साठी एक तोळा सोन्याची अंगठी ठेवण्यात आली आहे. याशिवाय फायनल सम्राट यासाठीही रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर श्रेय वादाचे राजकारण चांगलेच रंगले होते. त्यानंतर गेल्या महिन्यातच आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांनी आपापल्या भागात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते मात्र कोरोनाचे कारण पुढे करत जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन्ही शर्यती रद्द केल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण पुणे जिल्ह्यातील बैलगाडा शौकीन आणि मालक यांचे लक्ष या शर्यतीकडे लागून राहिले आहे.

from https://ift.tt/bUKTYoi

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *